अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती ।
तयाचिये चित्ती बोध कैसा ॥
अज्ञानाची पुजा कामिक भावना ।
तयाचिये ध्याना देव कैचा ॥
अज्ञानाचे कर्म फळी ठेवी मन ॥
निष्कम साधन तया कैचे ॥
तुका म्हणे जळो ऐसियाचे तोंड ।
अज्ञानाचे बंड वाढविती ॥
--- --- ----- संत तुकाराम ---
या अभंगात संत तुकाराम म्हणतात,
"अज्ञानी माणुस आपल्याला संपत्ती मिळावी म्हणुन भक्ती करतो. त्यांच्या अंतरंगी ईश्वराचे खरे स्वरुप कसे कळणार ? अज्ञानी माणुस मनात ईच्छा धरुन भक्तीची वाटचाल करतो. त्याची भक्ती निष्काम नसुन, सकाम असते। अज्ञानी माणसाचे ज्ञान विषयवासना, विकार, यापुरते सिमीत असते. त्यामुळे तो शाश्वत परब्रम्हाचे चिंतन कसे करु शकणार ? जे लोक आपल्या अज्ञानाचा धुमाकुळ घालतात, त्यांच्या तोंडाला आग लागो". निसर्गाच्या शक्तीपुढे माणुस दुबळा असतो. या विश्वाचे नियंरत्रण करणारी कुठलीतरी शक्ती असावी असे मानवाला म्हणुन त्याने देवदेवता यांची निर्मिती करुन त्यांच्याकडे धनधान्य, पुत्रपौत्र मिळावे अशी प्रार्थना केली. शत्रुच्या विनाशा करताही देवतांची प्रार्थना केली जात आहे .
आज ही माणूस देव देवतांकडे मागणे मागतोच आहे. तासनतास लोक विविध देवतांच्या दारी रांगा लावून आपल्या समस्या घेऊन उभे असतात. परमेश्वर हा सर्वशक्तीमान आहे. प्रसन्न होऊन त्याने आपल्याला सर्व प्रकारे मदत करावी अशी लोकांची अपेक्षा असते, अशा लोकांची भक्ती ही सकाम भक्ती असते. त्यांना शाश्वत सत्याची अनुभूती कशी येणार असा प्रश्न संत तुकारामाचे विचारला आहे." अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती । त्याच्या चित्ती बोध कैसा ॥ " या ओळीतून त्यांनी हेच वास्तव मांडले आहे.
आज एकविसाव्या शतकातही मोठ मोठ्या उत्सवात दर्शनासाठी "नवस करणारांसाठी वेगळी रांग" ही कल्पना रूढ आहेत. पोथ्या पुराणातून, देव आपले लौकिक मनोरथ पुरवतो ही बाब लोकांच्या मनावर वर्षांनुवर्षे ठसवली गेली आहे. "अज्ञानाची पूजा कामिक भावना । तयाचिया ध्याना देव कैंचा ॥" हे वास्तव तुकोबांनी ठामपणे मांडले आहे. मुलं व्हावी म्हणून ग्रामीण देवतांना नवस करण्याची वा पशू बळी देण्याची प्रथा अजूनही प्रचलित आहे. अशा लोकांना संत तुकारामांनी "नवसे कन्यापुत्र होती । मग का करावा लागे पती ॥" या भाषेत खडसावले आहे. एकविसाव्या शतकाची वाटचाल करणाऱ्या आणि जागतिक महासत्ता होऊ पाहणाऱ्या आपल्या देशात अजूनही सकर्तृत्व आणि आत्मविश्वास हीच आपल्या यशाची आयुधे आहेत या मुलभूत बाबींच्या जाणिवा प्रभावी नसाव्यात ही खेदाची गोष्ट आहे.
'जो देतो तो देव' ही सर्वसामान्य माणसाची देवाची व्याख्या आहे. आपल्या मनातील इच्छा, तृष्णा देवाने पुरवाव्यात, अशी लोकांची धारणा असते. ते लौकिकांच्या गुंतवळीत बुडालेले असतात. अशा अज्ञानी लोकांचा भोग मागणारा आणि मनोकामना पुरवणारा देव संत तुकारामांनी नाकारला. 'जळो त्याचे तोंड' या उद्गारावरून तुकारामांच्या मनातील सात्त्विक संताप किती तीव्र होता याची कल्पना येते. लोकांच्या देवा बाबतच्या कल्पना वरवरच्या आणि लौकिक लाभपूरत्या आहेत. ईश्वरी तत्त्वांचे शाश्वत स्वरूप जाणून घेणे हेच अध्यात्माचे मूलभूत सूत्र आहे हे वास्तव संत तुकारामांनी या अभंगात प्रतिपादन केले आहे. हे वास्तव ग्रहण करून त्यानुसार वर्तन करणे, देवत्वाच्या कल्पना पुन्हा तपासून घेणे ही काळाची गरज आहे. उज्ज्वल भविष्यासाठी तोच एक तरणोपाय आहे.
---- अमोल डोके ---
No comments:
Post a Comment