देह देवाचे मंदिर ।

*देह देवाचे मंदिर ।*
*आत आत्मा परमेश्वर ।।*

             हृदय हे जगातील सर्वात मोठे सुंदर मंदिर आहे. असे हृदय फारच कमी लोकांजवळ असते. प्रापंचिक संकटांनी आणि दुष्काळाने गांजलेले तुकाराम एक दिवस कोणालाही न सांगता, घराबाहेर पडले. मनाच्या निराश अवस्थेत त्यांनी डोंगराच्या गुहेत बसून विठोबाचं ध्यान करायचं ठरवलं. पंधरा दिवस ते अन्न पाण्यावाचून ध्यान करीत बसले. त्यानंतर त्यांच्या जीवनाचा दृष्टिकोन बदलून गेला. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी असं विठोबाचं वर्णन करणाऱ्या तुकारामांना, विठोबा केवळ मुर्तीत नसून आपल्यातच आहे, याची अनुभूती आली.

*देह देवाचे मंदिर ।*
*आत आत्मा परमेश्वर ।।*

*जशी ऊसात हो साखर ।*
*तसा देहात हो ईश्वर ।*
*जसे दुधामध्ये लोणी ।*
*तसा देही चक्रपाणी ।।*

*देह देहात देहात ।*
*का हो जाता देवळात ।*
*तुका सांगे मूढ जना ।*
*देही देव का पहाना ।।*

             ईश्वराचा अंश प्रत्येक माणसात आहे, फक्त तो आपण जाणला पाहिजे असे ते या अभंगात सांगतात. त्याला ते आत्मा म्हणतात. हा आत्मा म्हणजे काय? तर अगदी शुद्ध मन. ज्या मनात कोणतेही विकार नाहीत, म्हणजे काम, क्रोध, मद हे विकार नाहीत. अशा मनात केवळ प्रेम ही भावना असते आणि हाच आत्मा, ईश्वराचा अंश आहे. असे शुद्ध मन २४ तास आनंदात असते. बाह्य गोष्टीचा या मनावर परिणाम होत नाही. ज्याप्रमाणे ऊसातली साखर दिसत नाही, पण ती असते. त्याप्रमाणे देहातील म्हणजे शरीरातील देव दिसत नाही. तो असतोच. दुधात लोणी आहे, ते लोणी आपणास दिसत नाही. तसे मनावर बंधनाची प्रक्रिया केल्यावर, मनातील षड्रिपू गेल्यावर आपल्या शरीरातील म्हणजे देहातील ईश्वर जाणवेल. म्हणून शेवटी तुकाराम महाराज सांगतात, अरे देवळात का जाता? देवळात फक्त देव असते, असे नाही. आपल्या देहातील देव पहा. आपले सगळे षड्रिपू घालवा आणि अखंड आनंद घ्या. संत तुकाराम महाराज यांचा अजून एक अभंग आपण ऐकतो. "आनंदाचे डोही आनंद तरंग ।" त्याचा भावार्थही हाच आहे. तसेच संत कबीर आपल्या दोह्यात हाच संदेश देतात.

*मन मक्का, दिल व्दारीका ।*
*काया काशी जान ।।*

              तुझा देव तुझ्यातच आहे, त्याला शोधून तर बघ. एक सुंदर दृष्टांत पाहू या.

*सुंदर दृष्टांतः--*

              एक संन्याशी फिरत फिरत एका दुकानावरुन जात होता. त्याचे लक्ष गेले त्या दुकानात. दुकानात बरेच लहान मोठे डबे, बरण्या होत्या. संन्याशाला वाटले की, दुकानदाराला प्रत्येक डब्यात काय  आहे हे विचारुन बघावे. त्या दुकानदाराला एक डब्बा दाखवून विचारले की, यात काय आहे? दुकानदार म्हणाला, यात मीठ आहे. संन्याशी बुवाने आणखी दुसऱ्या डब्याकडे बोट दाखवून विचारले, यात काय आहे? दुकानदार म्हणाला, यात साखर आहे. असे करत करत बुवाने एक शेवटच्या डब्याकडे बोट दाखवून विचारले, या डब्यात काय आहे? दुकानदार म्हणाला, यात श्रीकृष्ण  आहे. संन्याशी अचंबित झाला आणि म्हणाला, अरे ! या नावाची कोणती वस्तू आहे. मी तर कधी ऐकली नाही. हे तर देवाचे नाव आहे. दुकानदार संन्याशी बुवाचे अज्ञानाला पाहून हसून म्हणाला, "महाराज तो तर रिकामा डबा आहे पण आम्ही व्यापारी रिकाम्या डब्याला रिकामा म्हणत नाही. रिकाम्या डब्यात श्रीकृष्ण आहे असे म्हणतो.

            संन्याशी बुवाचे डोळे खाडकन उघडले आणि त्याच्या डोळ्यात पाणी दाटून आहे. ते ईश्वराला म्हणाले, अरे ! कोणत्या कोणत्या रुपाने तू ज्ञान देतोस. ज्या गोष्टीसाठी मी एवढा भटकलो, घरदार सोडून संन्याशी झालो. ती गोष्ट एक दुकानदाराचे तोंडून मला ऐकवलीस. परमेश्वरा, मी तुझा शतशः आभारी आहे. असे म्हणून त्याने त्या दुकानदाराला साष्टांग नमस्कार केला.

*तात्पर्यः--*

            जे मन-बुद्धी-हृदय, काम , क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार, ईर्षा, द्वेष, चांगले वाईट आणि सुख दुःख अशा लौकिक गोष्टीने भरले आहे. तिथे श्रीकृष्ण म्हणजेच भगवंत कसा राहील? जे रिकामे आहे म्हणजेच स्वच्छ आहे अशाच ठिकाणी म्हणजे मन, बुद्धी व हृदयात परमेश्वर वास करतो. गीता, ज्ञानेश्वरी व ग्रंथ वाचले किंवा एकादशीला आळंदी, पंढरपूर वारी केली तरी मन, बुद्धी, हृदय जोपर्यंत रिकामे होत नाही म्हणजे स्वच्छ होत नाही तोपर्यंत परमेश्वर तेथे वास करणार नाही.

             "ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जून तिष्ठती" असे श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितले आहे. ईश्वराच्या निवासाचे स्थान हृदय म्हटले आहे. मनुष्याच्या दृष्टीने अवयवांचा राजा हृदयालाच म्हणावे लागेल. ईश्वर भक्तीभावाचा भुकेला आहे व भक्तीचा उद्भव हृदयात होतो.

            ईश्वर हा प्रार्थना मंदिरात आहे, देवळात आहे, म्हणून भक्त मंडळी तेथे जातात आणि डोळे मिटून हात जोडतात. पण धर्म सांगतो की, ईश्वराचा वास तर तुमच्या हृदयात आहे. असे स्पष्ट केले आहे. नावेतच पाणी शिरलं तर अनर्थ होतो, असा अनर्थ आपल्या जीवनात घडू नये म्हणून आपला देहच एक मंदिर आहे. या मंदिरात ईश्वराचे अधिष्ठान आहे, ही जाणीव सतत ठेवून जगायचे, तेही आनंदाने आणि समाधानाने ! 

            देवाच असणं आणि देवाचं नसनं या दोन्ही बाबतीत पुरातन काळापासून मत मतांतर आहे. देव मानणाऱ्यांना आस्तिक, तर देव न मानणाऱ्यांना नास्तिक म्हटले जाते. नास्तिक व आस्तिक ठरवणं यासाठी कोणतही वैचारिक मोजमाप नाही. "कुठे शोधिसी रामेश्वर, अन् कुठे शोधिसी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी" अशी माणसाची अवस्था असते. "देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर" असं मानणारेही खूप लोक आहेत. कधी तो सावळा विठ्ठल असेल, कधी बन्सीवाला कन्हैय्या असेल, कधी धनुर्धारी राम असेल तर कधी गावोगावच्या  जाखाई-जोखाई, मातामाय यामध्ये लोक देव पाहतील. देवत्वाबद्दल कुणाचं दुमत होण्याचं कारण नाही. माणसातील देवत्वाचा अनुभव आपण अनेकवेळा घेतच असतो. माणसातच नव्हे तर निसर्गातही देवत्व असते. संकटकाळी अचानकपणे एखाद्या अनोळखी माणूसही ऊभा राहतो आणि संकट निवारण करतो. तेव्हा सहज उद्गार निघतात की, देवासारखा धावून आलास ! कारण संकटात असणाऱ्याला तिथं त्या माणसात देवत्व दिसलं. म्हणूनच देवत्वाचा शोध घेतला की, निराळा देव शोधण्याची गरजच नाही. हा देवत्वाचा शोध म्हणजे माणुसकीचा शोध. नास्तिक असो की आस्तिक असो दोघांनाही देवत्व मंजूर आहे. देवत्व मंजूर असेल तर देव या शद्बाबद्दल वाद कशाला? ज्या देहाला संत मंदिर म्हणतात. त्या देहालाच आपण भ्रम, मोह, आसक्तीचं कोठार बनवून टाकतो. त्यामुळे ज्यांचे देह खरचं मंदिरासारखे मंगलमय, पवित्र आहेत, त्यांच्या हृदयात देव वास करतो. म्हणून देह हे देवाचे मंदिर आहे.
 *जयहरी ! जयसदगुरु !*


No comments:

विठ्ठल

वैष्णव 👏🏻👏🏻💐💐

वैष्णव 💐💐💐 संतांची 'वैष्णव' ह्या शब्दाची व्याप्ती मोठी आहे. भागवतात एकनाथ महाराज लिहितात, 'जाणीव शहाणीव ज्ञातेपण । सांडुनी जा...