*पूर्व जन्माचे संचित*
*जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले।*
*म्हणूनि या विठ्ठले कृपा केली।।*
*.. संत तुकाराम महाराज*
*आजचे जीवन हे मागील कर्माचे फळ असते. आता जे करता आहात, त्याचे फळ पुढे कधितरी मिळणारच. कर्म आणि त्याचे फळ यात कारण-कार्य संबंध आहे. महात्मा गौतम बुद्धाने कारणाचा सिद्धान्त सांगताना सांगितले की* -*‘इदं सति अस्मिन भवति।’*- याचा अर्थ ‘हे असे आहे म्हणून हे असे आहे.’ म्हणजे असे कर्म होते म्हणून त्याचे आजचे हे असे फळ आहे! पुनर्जन्माचा सिद्धान्त हे भारतीय तत्त्वज्ञानाची देण आहे. पण तो सिद्धान्त त्यांनी जसे अनुभवावर आधारित सांगितला तसा तो एका तार्किक सिद्धान्तावरही सांगितला आहे. काहीही कारण दिसत नसताना व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी घडताना दिसतात, त्याची उपपत्ती कशानेच लागत नाही.* *म्हणून त्याची जोड त्यांनी पूर्वजन्माच्या कर्माशी घातली व पूर्वीच्या कर्माचे फळ म्हणून आजचे भोगणे असते, असा हा सिद्धान्त सांगतो.*
*आत्म्याच्या अमरत्त्वाचा सिद्धान्त, कर्माच्या कारण-कार्यभावाचा सिद्धान्त, सृष्टीचे अचल निसर्गनियम, नीतिशास्त्राचे नैतिक नियम इ. अनेक गोष्टींची सांगड घालून शास्त्रकारांनी पूनर्जन्म आहे, असे तर्कतः सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गौतम बुद्धाने जो त्याच्या आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाचा शोध लावला त्या *‘प्रतित्यसमुत्पाद सिद्धान्त’* असे म्हणतात. त्यात बुद्धाने दुःखाची बारा कारणे सांगितली आहेत. त्यालाच *‘द्वादशनिदान’* असेही म्हणतात. तो सिद्धान्तच मुळी तीन जन्मावर आधारित आहे. भारतीय तत्त्वज्ञानात चार्वाकाचा अपवाद सोडून पुनर्जन्म या विषयांवर सर्वांचे एकमत आहे.*
*हा जन्म कोण घेतो? आत्मा तर सर्वत्र भरून राहिलेला आहे. तो कुठे जात नाही आणि येत नाही. तो स्थिर, नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त व स्वभाववान आहे. जन्म घेतो तो जीव होय. शंकराचार्यांच्या भाषेत अंतःकरणाधिष्ठित चैतन्य म्हणजे जीव होय. त्यालाच सर्व भोग भोगावे लागतात आणि अनेक जन्मांच्या रहाटगाडग्यासारख्या चक्रात अडकावे लागते. बुद्धाच्या भाषेत ‘चित्तचैतसंघाताचे संतान’ हे पुनर्जन्म घेते. तर जैनांनीही जीवच जन्माला येतो व संसारचक्रात अडकतो असे सांगितले आहे. हे सगळे झाले सिद्धान्त. सिद्धान्त तेव्हाच खरा ठरतो जेव्हा त्याला अनुभवाची जोड असते. मला दूरवर कुठेतरी पाणी दिसले आणि ते पिण्याची मला प्रवृत्ती झाली. म्हणजे मला तहाण लागलेली आहे आणि दूरवर पाणी दिसते आहे. मी तिथे गेलो, पाणी घेतले, ते पिलो आणि माझी तहाण शमली तरच मघाशी दूरवर दिसलेले पाणी खरे होते. असा त्याचा अर्थ आहे. ते पाणी फक्त डोळ्यांनी दिसले पण मला ते पिता आले नाही व माझी तहाण शमली नाही, तर ते पाणी खरे नव्हते तर ते खोटे होते. ते एक मृगजळ होते. असा याचा अर्थ होतो. म्हणजे भारतीय न्यायशास्त्रात सत्य कशाला म्हणावे, याविषयी सांगताना ‘सफलप्रवृत्तीजनकत्त्व’ असा एक निकष सांगितलेला आहे. त्यालाच ‘फलतःप्रामाण्यवादी उपपत्ती’ असे म्हणतात. इंग्रजीमध्ये त्यालाच प्रॅग्मॅटिक थेअरी ऑफ ट्रूथ असे म्हणतात. म्हणजे मी एखादी गोष्ट गृहित धरून चाललो आणि त्यातून माझ्या प्रवृत्ती जर सफल झाल्या, तर मी गृहित धरलेले सत्य होते, असा याचा अर्थ होतो. ‘ईश्वर आहे’ असे गृहित धरून मी चाललो आणि त्यातून माझ्या अनेक गोष्टी सफल झाल्या तर ‘ईश्वर आहे, ’ हे माझे गृहितक सत्य ठरते.*
*हा सिद्धान्त पुनर्जन्माला लावला तरी पुनर्जन्म सिद्ध होतो. कारण त्याला अनुभवाची जोड असते. पुनर्जन्माचा अनुभव घेता येतो, देता येतो. या जगात जन्माला येताना व्यक्ती मागील अनेक प्रकारचे *‘पॅटर्न’ व ‘फॉर्म्स’* घेऊन जन्माला येत असते. त्यानुसार त्याच्या व्यक्तिमत्त्वाची घडण होत असते. एकाच संस्कारात ठेवलेल्या दोन जुळ्यांची जीवने तपासली तरी हेच यातून दिसून येते. दोन सख्खे भाऊ, बहिणी किवा एकाच घरातील अनेक सदस्य वेगवेगळ्या वृत्तीचे, प्रवृत्तीचे, विभिन्न विचारांचे असतात. त्यांना येणारे अनुभवही वेगवेगळे असतात. व्यक्तीला जो अनुभव येतो तो प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. एकच गोष्ट प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारची दिसते, जाणवते. या अनुभवाला कारण असतात त्याच्या पाठीमागील स्मृतींच्या चौकटी. प्रत्येकाच्या स्मृती वेगवेगळ्या असतात त्यामुळे त्यांना येणारे अनुभवही वेगवेगळे असतात.*
*मागे अनेक जन्म घेऊन जीव जन्माला येत असतो. प्रत्येक जीव त्याच्या लाखो वर्षांच्या इतिहासाच्या बंधनाने बद्ध आहे. त्यातून सुटण्यासाठीच अध्यात्माचे प्रयोजन झालेले आहे. शरीर मरते पण जीव जन्म घेतो. या संसारचक्रात पुनःपुन्हा येत राहातो. तीच तीच माणसे त्यालाही पाहावी लागतात. त्यांच्याशीच संबंध येत राहातात. यातून सुटका सहजासहजी होत नाही. त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात.*
*अनेक आजारांची कारणेही मागील जन्मातील कर्मात असतात. त्या कर्मापर्यंत जाऊन ते उजागर केले की त्यातून निर्माण झालेला आजार बरा होतो. याच्यावर हजारो लोकांनी प्रयोग केलेत व ते यशस्वीही झालेले आहेत. याच्या एक पाऊल पुढे जाऊन असेही करता येणे शक्य आहे असे मला वाटते की, जसे मागील जन्मातील विशिष्ट कर्मामुळे वा घटनेमुळे विशिष्ट आजार होतो. तसेच या जन्मात भोगाव्या लागणाऱ्या परिस्थितीलाही मागील जन्मातील अनेक कर्मे व घटनाच कारणीभूत असतात. त्या त्या वेळेप्रमाणे त्या फाईली ओपन होतात आणि आपल्या समोर विशिष्ट परिस्थितीच्या रूपाने सामोऱ्या येतात.*
_*मग जर आपली परिस्थिती बदलायची असेल तर ज्या कोणत्या फाईलीमुळे ती परिस्थिती निर्माण झालेली आहे, तिथंपर्यंत पोहोचून या जन्मातील परिस्थितीसुद्धा बदलणे शक्य आहे.* आपल्या आजच्या परिस्थितीला आपणच कारणीभूत असतो व ती बदलण्यासाठी आपण प्रयत्न केला तर आजची कसलीही परिस्थिती आपणच बदलू शकतो! *म्हणूनच आपण आपल्या भाग्याचे निर्मातेही बनू शकतो.* मागे झालेल्या चुका सुधारू शकतो. नव्याने सुरुवात करू शकतो आणि हवे तसे आरोग्यपूर्ण, समृद्ध जीवन निखळ आनंदाचा अनुभव घेत जगू शकतो.*_
No comments:
Post a Comment