अनुभवें कळों येतें पांडुरंगा।
रुसावें तें कां गा तुम्हांवरी।।१।।
आवरितां चित्त नावरे दुर्जन।
घात करी मन माझें मज।।२।।
अंतरीं संसार भक्ति बाह्याकार।
म्हणोनि अंतर तुझ्या पायीं।।३।।
तुका म्हणे काय करूं नेणें वर्म।
आलें तैसें कर्म सोसूं पुढें।।४।।
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
---:-हे पांडुरंगा,(तुझी प्राप्ति कां होत नाहीं,ह्याचें कारण माझ्यांत दोष आहेत हें) मला स्वत:चे अनुभवानें कळून आलें आहे,तर तुमचेवर विनाकारण कशाकरितां रुसावें?.*
*माझें चित्त फार वाईट आहे.त्यास कितीही आवरलें तरी तें आवरलें जात नाहीं आणि माझें मन माझ्याच घातावर उठलें आहे.*
*अंत:करणांत संसार असून बाह्यात्कारीं भक्तीचें भूषण मिरवितों, म्हणून तुझे पायाशीं अंतर होत आहे.*
*तुकाराम महाराज म्हणतात,तुझ्या प्राप्तीचें वर्म मला कळत नाहीं त्यास मी काय करूं? आतां पूर्वींचें संचितकर्म जसें असेल तसें पुढें सोसावें लागेल (ह्याशिवाय त्याच्या परिहाराचा उपाय मला सुचत नाहीं).*
आतां कोठें धांवे मन |
तुझे चरण देखलिया ||१||
भाग गेला शीण गेला |
अवघा झाला आनंदु ||२||
प्रेमरसें बैसली मिठी |
आवडी लाठी मुखासी ||३||
तुका म्हणे आम्हां जोगें |
विठ्ठल घोगे खरें माप ||४||
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
:- देवा ,तुमच्या चरणरूपी स्वरूपाचा आत्मत्वाने साक्षात्कार झाल्यावर आता हे मन कोठे बरे धाव घेईल .तुमच्या साक्षात्काराने माझा शीणभाग गेला असून सर्वत्र आनंदाची प्रतीती येत आहे. भक्तिप्रेमाने तुमच्या पायाला मिठी बसली असून ,मुखाला नाम घेण्याची बळकट आवड निर्माण झाली आहे.जीवनात अनेक संकट येतात पंरतु हरिनामाने ते लोप पावतात. म्हणुन हरिचिंतनाने एकमुख होऊ. म्हणुन जगद्गुरु तुकाराम महाराजम्हणतात ,आम्हाला जसे पाहिजे होते ,तसे विठ्ठलासारखे मोठे व खरे माप पदरी पडले आहे .
🌷🌷शुभ सकाळ 🌷🌷
श्री विठ्ठलाच्या चरणी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
No comments:
Post a Comment