जंव हे सकळ सिद्ध आहे ।. . .


जंव हें सकळ सिध्द आहे ।
हात चालावया पाय ॥
तंव तूं आपुलें स्वहित पाहें ।
तीर्थ यात्रे जाय चुकों नको ||१||
जंव काळ असे दुरी ठेला ।
तंव तूं हरिगुण गाय आइक वहिला ॥
मनीं भाव  धरूनी भला ।
न वंचे त्याला चुकों नको ||२||
जोडोनी धन न घालीं माती ।
ब्रह्मवृंदे पूजन यती ।।
सत्य आचरण दया भूतीं ।
करीं सांगाती चुकों नको ||३||
दशा यौवन बाणली अंगीं ।पांगिला नव्हे विषयसंगीं ॥
काम क्रोध लोभ मोह त्यागीं ।
राहें संतसंगीं चुकों नको ||४||
मग तेथें न चले कांहीं ।
सत्ता संपदा राहेल ठायींच्या ठायीं ॥
पुढे संचित जाईल ग्वाही ।
तुका म्हणे तई यम आज्ञा ||५||
भावार्थ - 
           जोपर्यंत देह , इंद्रिये सुदृढ आहेत , हातात-पायात देण्या-घेण्याची व चालण्याची शक्ती आहे , तोपर्यंतच तू आपल्या स्वहिताचा विचार कर ; आणि तीर्थयात्राला जाण्यास चुकू नकोस .||१||
              जोपर्यत काळ दूर आहे .तोपर्यत मनात शुध्दभाव धरून प्रथम हरिगुण गा ; आणि संतांच्या मुखाने ऐक .हे करण्यास अंगचोरपणा करून चुकू नकोस .||२||
           मिळविलेल्या धनाचा वाईट व्यवहाराकडे व्यय  करू नकोस .किंवा जमिनीत पुरून ठेवून त्यावर माती घालू नकोस .त्याचा योग्य विनियोग करून ब्राह्मण , संन्यासी यांची पूजा कर ; आणि तुझे आचरण , नेहमी शास्रशुध्द असू दे .खरे बोलणे , भूतमात्रांविषयी दया , इत्यादी दैवी संपत्तीला तू आपल्या देहाची सोबतीण कर ; आणि हे सर्व करण्यास चुकू नकोस .||३||
              तुझ्या अंगात तारुण्य आले तरीही विषयासक्त होऊन त्याच्या अधीन होऊ नकोस .काम , क्रोध , लोभ आणि मोह यांचा त्याग कर .संतसंगतीत राहा .हे सर्व करण्यास चुकू नकोस .||४||
              तुकाराम महाराज म्हणतात , अरे नरा , वर सांगितलेले करण्यास चुकलास , तर यमाच्या घरी तुझे काही चालणार नाही .सत्ता , संपत्ती जागच्या जागीच राहतील .पुढे तुझे पाप यमापुढे साक्ष देण्याकरिता जाईल .त्याने तुझे दुराचरण निवेदन केल्यानंतर मग तुला घेऊन येण्याविषयी यमदूतांना यमाची आज्ञा होईल .||५||

----  शिणलो दातारा करिता येरझारा | 
आतां सोडवी संसारापासोनिया ||1||

न सुटेचि बाकी नव्हे झाडापाडा | 
घातलासे खोडा हाडांचिया ||2||

मायबाये माझी जिवाची सांगाती | 
ती देतील हाती काळाचिया ||3||

पडताळूनि सूरी बैसला शेजारी | 
यम फासा करी घेऊनिया ||4||

पाठी पोटी एके लागली सरसी | 
नेती नरकापाशी ओढोनिया ||5||

जन साह्यभुत असे या सकळा | 
मी एक निराळा परदेशी ||6||

कोणा काकुलती नाही कोणे परी | 
तुजविण हरी कृपाळुवा ||7||

तुका म्हणे मज तुझाचि भरवसा | 
म्हणऊनि आशा मोकलिली ||8||
                                    
हे दातारा पांडुरंगा जन्ममरणाच्या येरझा-या  करता करता मी फार श्रमलो आहे आता या जन्ममरण रूपी संसारातून मला सोडव •||1||

संचित कर्माची बाकी संपत नाही ; त्यामुळे प्रारब्ध कर्माचा हिशोबही पूर्ण होत नाही • त्या योगाने देहाच्या हाडाला जन्ममरणाचा खोडा घातला आहे •||2||

माझे मायबाप माझ्या वर्तमान जन्माचे सोबती आहेत पण ते देखील मला काळाच्या स्वाधीन करतील •||3||

यम हा माझ्या आयुष्याचा मेळ पाहुन सुरी परजून व फासे हातात घेऊन माझ्या शेजारी बसला आहे •||4||

ती सुरी एकदम माझ्या पाठी - पोटी लागली असुन ते पाश मला बांधुन मला नरकाकडे ओडुन नेतात •||5||

आणि ह्या सर्व अनर्थाला लोक देखील साह्य करतात अशा परिस्थितीत मी सर्वा पासुन बाजूला पडलेला एकटा परदेशी काय करणार आहे ? ||6||

हे कृपाळू श्रीहरी त्यावेळी तुझ्या वाचून कोणालाही माझी दया येणे शक्य नाही •||7||

तुकाराम महाराज म्हणतात देवा त्यावेळी मला तुझाच एक भरवसा आहे ; म्हणुन मी सर्वाची आशा सोडून दिली आहे •||8||
        🌺विठ्ठल 🌺विठ्ठल 🌺विठ्ठल 🌺
||जय विठ्ठल ||जय तुकोबाराय ||

No comments:

विठ्ठल

वैष्णव 👏🏻👏🏻💐💐

वैष्णव 💐💐💐 संतांची 'वैष्णव' ह्या शब्दाची व्याप्ती मोठी आहे. भागवतात एकनाथ महाराज लिहितात, 'जाणीव शहाणीव ज्ञातेपण । सांडुनी जा...