*तारी मज आता रखुमाईच्या कांता*
*तारी मज आता रखुमाईच्या कांता ।
पंढरीच्या नाथा मायबापा ॥
अनाथाचा नाथ ऐकियले कानी ।
सनकादिक मुनी बोलताती ॥
त्याचिया वचनाचा पावोनी विश्वास ।
धरी तुझी कास पांडुरंगा ॥
नामयाची लेकी निंबाई म्हणे देवा ।
कृपाळू केशवा सांभाळावे ॥
>-----> संत निंबाई
>----> संत निंबाई ही संत नामदेवांची कन्या. तिने विठ्ठलभक्तीपर अभंगरचना केल्या आहेत. या अभंगात संत निंबाई म्हणते, "हे मायबापा पांडुरंगा, तु माझे रक्षण कर. सांभाळ कर. तु अनाथांचा नाथ आहेस असे मी माझ्या कानांनी ऐकले आहे. सनकादिक म्हणजेच ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सनक, सनंदन, सनत्सुजात आणि सनंदकुमार हे मुनीसुध्दा असेच वर्णन करतात. त्यांच्या वचनाचा वा बोलण्याचा विश्वास धरुन आम्ही तुझ्या प्राप्तीची इच्छा बागळली आहे. आम्ही तुझ्या आश्रयाला आलो आहे. हे कृपाळू केशवा, तु माझा सांभाळ कर."
>------> विठ्ठल आपल्या भक्तांचा सांभाळ करतो अशी त्याची ख्याती आहे. तो अनाथाचा नाथ आहे, दीनांचा दयाळ आहे आणि अवघ्यांचा मायबाप आहे. सनकादिक मुनींनी त्याची स्तुती केली आहे. अशा थोर ऋषीमुनींचे शब्द म्हणजे सत्त्याची परमावधी. त्यांच्या शब्दांवर विसंबून मी तुझ्याकडे आले आहे, माझा संभाळ कर असे निंबाई विठ्ठलाच्या चरणी विनवणी करते.
>-----> संत नामदेव हे भक्ती भक्तीचे मूर्त रूप. वारकरी पंथाला बहुजनांचे अधिष्ठान दिले ते नामदेवांनी. मंदिरात बंदिस्त असलेली कीर्तनपरंपरा त्यांनी खुल्या वाळवंटात नेली आणि भक्तीचा पाया आणखी व्यापक केला. सर्व जातीपातीतील संतांची मांदियाळी त्यांनी जमवली आणि वारकरी भक्तीपरंपरेला सर्वसमावेशक रूप दिले. विठ्ठलभक्तीचा हा प्रसार त्यांनी मराठी मुलखात केला केलाच पण उत्तर भारतातही पंजाबपर्यंत नेऊन विठ्ठलभक्ती आणि वारकरी परंपरेची पाळेमुळे तिथल्या मातीत रुजविली.
>-------> संत नामदेवांचे हे कर्तृत्त्व ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. जातीपातींच्या जंजाळात अडकलेल्या मानसिकतेमुळे मराठी भूमीत नामदेवांच्या कामाचे योग्य मूल्यमापन झाले नाही, ही खेदजनक वस्तुस्थिती आहे. संतवाणीतील भक्तितत्त्वाबरोबरच संतांच्या विचारांचा आवाका समजून घेणे गरजेचे आहे, असे आग्रहाने नमूद करावेसे वाटते.
>------> संत नामदेवांच्या विठ्ठल भक्तीचा रंग कुटुंबीयांच्या सर्व सदस्यांमध्ये उतरला होता. महादा, नारा, विठा, गोंदा हे पुत्र कन्या निंबाई, पत्नी गोणाई, बहीण आऊबाई, सून लाडाई आणि दासी जनाबाई असे कुटुंबीय अभंगरचना करीत होते. संत नामदेवांचा पारमार्थिक अधिकार मोठा होता. संतसंग ही घरात नित्याची बाब होती. त्यामुळे सर्वांना भक्तीची ओढ लागणे साहजिक होते. निंबाईचा नामदेवगाथेत एकच अभंग उपलब्ध आहे. "नामयाची लेकी" असा तीने स्वतः केलेला उल्लेख तिची नामदेवांप्रती असलेली श्रद्धा प्रकट करतो. ती नामदेवांची कन्या ती तशीच शिष्याही होती.
>-----> "तारी मज आता रखुमाईच्या कांता" या ओळीतील नाद, लय मनाला लुब्ध करतात. त्यातील आर्ततेचा स्वर काळजाला भिडतो. एकच अभंग लिहून निंबाई भक्तीच्या या सोहळ्यात अजरामर झाली आहे.
>-----> अमोल डोके*
No comments:
Post a Comment