विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म |भेदाभेद भ्रम अमंगळ ||१||
आइकाजी तुम्ही भक्त भागवत |कराल ते हित सत्य करा ||२||
कोण्याही जीवांचा न घडो मत्सर |वर्म सर्वेश्वर पूजनाचे ||३||
तुका म्हणे एका देहाचे अवयव |सुखदुःख जीव भोग पावे ||४||
श्रीपंढरीश भगवान परमात्मा , कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबाराय , वैराग्यमूर्ती श्रीतुकोबाराय , शांतीब्रह्म श्रीनाथमहाराज , सकल संत मांदियाळी यांचे चरणी नतमस्तक होऊन आदरणीय प्रेममूर्ती ह.भ.प.बाळकृष्णजी महाराज यांचे आशिर्वादाने सर्वांचे चरणी लीन होऊन भगवद्बुध्दीने चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो .
जगदगुरू श्रीतुकोबाराय या अभंगाद्वारे काही विशिष्ट लोकांना व विशिष्ट विषयांचा उपदेश करतात .विशिष्ट लोक कोण तर जे भक्त भागवत आहेत तेच .हेच श्रीतुकोबाराय द्वितीय चरणात सांगतात --
आइका जी तुम्ही भक्त भागवत |कराल ते हित सत्य करा ||२||
प्रथम भक्त भागवत कोण ? याचा विचार करू .प्रत्येक जण भक्त असतोच .पण प्रत्येक जण विठोबाचा भक्त नसतो .इतर देवतांचा भक्त होण्यात कृतार्थता नाही आणि विठोबाचे भक्त होण्यात बध्दता नाही .
सेंदरीं हेंदरी दैवते |कोण ती पूजी भूते खेते |आपुल्या पोटा जी रडते |मागती शिते अवदान ||
अशा देवतांचे भक्त होण्यात कोणतेच हित नाही .म्हणून पंढरीरायाचे भक्त म्हणजे हरिभक्त व्हावे .मनुष्याने ' भक्तभागवत ' व्हावे .
उत्तम भागवत कोणास म्हणावे ? श्रीमद्भागवत मध्ये सुंदर वर्णन आलेले आहे .
सर्वभूतेषु यः पश्येद् भगवद्भावमात्मनः |
भूतानि भगवत्त्यात्मन्येषु भागवतोत्तम ||
सर्व भूतांच्या ठिकाणी भगवद्दृष्टीने पाहणे याला उत्तम भागवत म्हणतात .
यालाच श्रीज्ञानोबाराय ' भक्तियोग ' म्हणतात .
जे जे भेटिजे भूत |ते ते मानिजे भगवंत ||
हा भक्तियोग निश्चित |जाण माझा ||
श्रीनामदेवमहाराज --
सर्वाभूती पाहे एक वासुदेव |पुसोनियां ठाव अहंतेचा ||
सर्व प्राणीमात्रांचे ठिकाणी भगवद् दृष्टी येण्याकरिता ' आपपर ' जावे लागते .ज्याचे ठिकाणी आपपरभाव नसतो , त्यालाच भगवद्दृष्टी प्राप्त होते श्रीतुकोबाराय म्हणतात -
नाठवे आपपर आता काय गा करूं |सारिखा दोहीसवा हरपला विचारू |घातला योगक्षेम आपुला भारू ||
तुकया शरणांगता देई अभय करू |विठोबा दान दे गा तुझ्या सारिखे नामा ||
तात्पर्य -
ज्याचे ठिकाणी आपपर नाही आणि जो सर्व भूतांचे ठिकाणी सम पाहतो , तो उत्तम भागवत होय .
असा जो भागवतोत्तम आहे , तो कोणाची निंदा , द्वेष , मत्सर करीत नाही .हीच शिकवण श्रीतुकोबाराय या अभंगाच्या तृतीय चरणातून देतात --
कोण्याही जीवाचा न घडो मत्सर |वर्म सर्वेश्वर पूजनाचे ||३||
तात्पर्य असे जे भक्त भागवत आहेत , त्यांचे दोन प्रकार पडतात .
१) सिध्द भक्त भागवत
२) साधक भक्त भागवत .
साधक भक्त भागवत या अभंगाचा विशिष्ट अधिकारी आहे .या अभंगाचा अधिकारी जसा विशिष्ट आहे तसा विषयही विशिष्ट आहे .तो विषय कौणता ? हे श्रीतुकोबाराय प्रथम चरणात सांगतात -
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म |भेदाभेद भ्रम अमंगळ ||१||
वैष्णवांचा धर्म प्रतिपादन करणे हा या अभंगाचा मुख्य विषय आहे व साधक भक्त भागवत हा अधिकारी आहे .भक्त भागवत धर्माप्रमाणे वागला तर त्याचे फल काय ?
सत्य हित प्राप्त हहोणे हे या अभंगाचे प्रयोजन आहे .आणि संबंध तर आहेच आहे .तात्पर्य श्रीतुकोबाराय या अभंगातून वैष्णवांच्या धर्माचा उपदेश करतात -
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म |भेदाभेद भ्रम अमंगळ ||१||
वाक्य म्हटले की , त्यात कर्ता , कर्म , क्रियापद असतेच .परंतु या अभंगात क्रियापद नाही .जसे गोत्र माहित नसेल तर कश्यप सांगतात , तसेच वाक्यात क्रियापद नसेल तर ' अस्ति ' हे क्रियापद लावतात .
अस्ति हे क्रियापद लावले म्हणजे जग विष्णुमय आहे व हाच वैष्णवांचा धर्म आहे असा सरळ अर्थ निघतो .
अस्ति हे क्रियापद सिध्द वस्तूचे बोधक आहे .आणि धर्माधर्म या साध्य वस्तु आहेत .
याठिकाणी विशिष्ट आचाराला धर्म असे म्हटले आहे .विशिष्ट आचार कोणता ? तर सर्वांविषयी परमात्म दृष्टी ठेवावी व परमात्म दृष्टी ठेवली की त्याचे ठिकाणी भेदाभेद राहात नाही कारण तो अमंगळ आहे .
भेदाभेद याचा अर्थ भेदभाव न करणे हाच होय ,भेदाभेद भ्रम अमंगळ यात भ्रम हे पद आलेले आहे ,त्याचा विचार होणे आवश्यक आहे .
जग विष्णुमय असताना , भेदाचा गंध नसतानाही भेद प्रतितिला येणे यालाच भ्रम असे म्हणतात .
भेदाचे पाच प्रकार आहेत .
१) जीव जडाचा भेद
२) जीव ईश्वराचा भेद
३) जीव जीवाचा भेद
४) जड जडाचा भेद
५) जड ईश्वराचा भेद .
भेद दिसणे हा जसा भ्रम आहे तसाच अभेद हाही भ्रमच आहे .
परंतु या अभंगात कोण्याही जीवाचा न घडो मत्सर या चरणावरून भेदभाव समजणे हा भ्रम आहे .कारण या मत्सराचे कारण आपपरभाव आहे .आपपरभाव हा अभेदप्रतीतीस नसतो तर द्वैत प्रतीतीस असतो .
विशाल अंतःकरणाचे जे महात्मे असतात , त्यांचे ठिकाणी भेद नसतो तर सर्व जग विष्णुमय आहे हेच या अभंगातून कर्तव्य सांगितलेले आहे .
वस्तुशी सुखप्रयोजकता हे मंगळतेचे प्रयोजक आहे ,भेद भ्रम हा अमंगळच आहे कारण भेदाचे पर्यावसान दुःखात होते .श्रीज्ञानोबाराय म्हणतात -
आणि दुजे जंव जंव घडे |तंव तंव संसार भय जोडे ||
हे देवो आपुलेनि तोंडे |बोलती वेद ||
जो या परमात्म स्वरूपाचे ठिकाणी भेद पाहतो , तो दुःखाला प्राप्त होतो ,दुःखाला कारण द्वैत आहे .श्रीतुकोबारायांचे ठिकाणी ते द्वैतच शिल्लक राहिले नव्हते ,त्यांचेच उदगार पाहू
सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे ||
वृत्ति हे निवृत्ती झाली जन न दिसे तेथे ||
मी माझे हरपलें ठायी जेथींच्या तेथे ||
अदृश्य तेंचि झाले कांहीं दृश्य जे होते ||
सुखे मी निजलो गा शुन्य सारूनि तेथे ||धृ||
तात्पर्य -
विष्णुमय जग ही दृष्टी महात्म्यांना आलेली असते .
साधकाला ती दृष्टी प्राप्त करून घ्यावयाची असते .
त्यासाठी साधकाने धर्माप्रमाणे आचरण करावे लागते .
धर्माप्रमाणे वागले तरच त्याला सत्य हित प्राप्त होते
म्हणून श्रीतुकोबाराय म्हणतात ,
ऐका जी तुम्ही भक्त भागवत |कराल ते हित सत्य करा ||२||
सत्य हिताचे साधन कोणते ?तर ,
कोण्याही जीवाचा न घडो मत्सर |वर्म सर्वेश्वर पूजनाचे ||३||
कोणत्याही जीवाचा मत्सर घडू नये .कारण ,
विठ्ठल जळी स्थळी भरला |रिता ठाव नाही उरला ||
दृश्यमान जगतात एक परमात्माच भरून उरलेला आहे ..म्हणून कोणालाही दुःख दिले तर ते भगवंतालाच दिल्यासारखे आहे .याकरिता श्रीतुकोबाराय म्हणतात -
तुका म्हणे एका देहाचे अवयव |सुखदुःख जीव भोग पावे ||४||
||विठोबा रखुमाई ||
विष्णुमय जग हा वैष्णवांचा धर्म आहे .जग विष्णुमय आहे .कारण
१) जया पासोनि सकळ |महिमंडळ हे झाले
२) परमात्मा कसा आहे ? तर -
अव्यक्त निराकार नाही ज्या आकार |
जेथोनि चराचर हरीसी भजे ||
भगवंताव्यतिरिक्त दुसरे काहीच नाही .
या अभंगात मय असे पद आलेले आहे ,त्याचा अर्थ स्वरूपार्थीच घ्यावा लागतो
||!ज्ञानेश्वर माऊली ||ज्ञानराज माऊली तुकाराम ||
स्वरूपार्थी याचा अर्थ स्वार्थी .माऊली ज्ञानोबाराय म्हणतात -
आमुचा प्रकृती पैलकडील भावो |जरी कल्पनेविण लागसी पाहो |तरी मज माजी भूते हेही वावो |जे मी सर्व म्हणोनि ||(ज्ञाने )
सर्व ठिकाणी परमात्माच आहे .म्हणून श्रीतुकोबाराय म्हणतात -
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म |भेदाभेद भ्रम अमंगळ ||१||
जग विष्णुमय आहे असे जाणावे .जग विष्णुरूप आहे असे जाणले की जीव कृतार्थ होतो .
या अभंगात समदर्शन सांगितले आहे .समवर्तनात अधोगती आहे आणि समदर्शनात कृतार्थता आहे .
झालेली चिंतनसेवा श्रीभगवान पंढरीस परमात्मा , सकल संतमांदियाळी , श्रीगुरूतत्व आदरणीय प्रेममूर्ती ह.भ.प.श्री .बाळकृष्णजी महाराज आणि सर्वच साधक यांचे चरणी समर्पित करतो .
करविली तैसी केली कटकट |वाकुडे का नीट देव जाणे ||
चांंगले ते माझ्या सदगुरूंचे बाकीचे माझे दोष .
सेवेला पूर्णविराम .
||जय विठ्ठल ||जय हरि विठ्ठल ||
No comments:
Post a Comment