राम व रावण

#राम_आणि_रावण

*हे जग द्वैतमय जोड्यांनी बनलेले आहे. विरोधी जोड्या, व्याघाती जोड्या, सुसंवादी जोड्या, सहाय्यक जोड्या वगैरे. पण हे आहे द्वैतमय. या जगात विचार आहे तसा विखारही आहे. विवेक आहे तसे अविचारही आहे. संस्कृती आहे तसी विकृतीही आहे. चांगले आहे तसे वाईटही आहे. दिवस आहे, रात्र आहे. स्त्री-पुरुष, देव-देवी, प्रकाश-अंधार, मागे-पुढे, खाली-वर, जड-उतार, सरळ-वाकडे इ. या जोड्यांचा समुच्चय म्हणजे हे जग होय. जगात एकच एक गोष्ट असू शकत नाही. आद्य शंकराचार्य म्हणाले, सत्यअनऋत मिथुनेकृत जगः। म्हणजे सत्य आणि असत्य यांचे बेमालूम मिश्रण म्हणजे जग होय.*
🕉🔱🚩🙏🏻
*या जोड्यातील प्रत्येक गोष्ट आपापल्या ठिकाणी काम करीत असते. त्याच्या काही संदर्भ चौकटी बनत असतात. त्या त्या संदर्भ चौकटीनुसार ती गोष्ट चांगली किंवा वाईट हे ठरत असते. म्हणजे एक माणूस एकाचा चांगला मित्र असू शकतो त्याच वेळी तो कुणाचातरी खूप मोठा शत्रू असू शकतो. मग तो नेमका कसा असतो? शत्रू की मित्र? एकच व्यक्ती एका वेळी मित्रही असते आणि शत्रूही!*
🕉🔱🚩🙏🏻
*या जगात प्रत्येकजण आपापली संदर्भ चौकट घेऊन जन्माला आलेला असतो. त्याप्रमाणे त्याला माणसे भेटत जातात. त्याची मागील फाईल अनफोल्ड होत असते व त्याच्या समोर त्याची या क्षणाची परिस्थिती पुढे येऊन उभी राहात असते. प्रत्येकजन त्या संदर्भचौकटीनुसार आपापली भूमिका पार पाडीत असतो आणि हिशोब पूर्ण करून निघून जात असतो. यात होते काय, तर त्यात आणखी कर्माची भर घालून तो जात असतो. ते कर्माचा हिशोब त्याला पुन्हा कधीतरी द्यावा लागतो. असे हे न संपणारे कर्मचक्र सतत चालू राहाते. आता जो आपला शत्रू वाटतो तो त्याचा मागला हिशोब पूर्ण करीत असतो आणि आता जो मित्र वाटतो तो त्याचा मागला हिशोब फेडीत असतो. खरे तर दोन्हीही तेच करीत असतात. म्हणून दोघेही सारखेच असतात. त्यांच्यात फरक करता येत नाही. कारण दोघेही आपापला हिशोब पूर्ण करण्यासाठीच आपल्या संपर्कात आलेले असतात. हे निसर्गाचे एक अचूक असे गणित आहे. ते कधी चुकत नाही. कारण केलेले कर्म हे निसर्गाच्या कुठल्यातरी एका कालचक्रात अडकलेले असते. ते कालचक्र फिरत जेव्हा पूर्वस्थितीत येते तेव्हा ते कर्म आपल्यासमोर उभे ठाकते आणि तेव्हा ते फेडावेच लागते. त्याला पर्याय नाही. कर्मचक्र आणि कालचक्र नेमके कसे काम करते त्याविषयी विस्ताराने पुढे कधीतरी लिहीन.*
🕉🔱🚩🙏🏻
*हे जग असे द्वैतात्मक असल्यामुळे आणि प्रत्येक जण आपापल्या संदर्भचौकटीप्रमाणे वागत असल्याने काहींची संदर्भचौकट रामाची असते तर काहींची रावणाची असते! हे जगत ही ईश्वराचीच अभिव्यक्ती आहे. त्याच्याशिवाय या जगात कशालाच अस्तित्वच उरत नाही. जे काही आहे ते त्याचीच निर्मिती आहे किंबहुना त्याचीच वेगवेगळी रूपे आहेत. रामही त्याचेच रूप आणि रावणही त्याचेच रूप. दोन्ही प्रकारे तोच एक प्रकट झालेला आहे. या जगाचा व्यवहार चालायचा असेल तर एकजन देणारा व एकजन घेणारा असेल तरच व्यवहार शक्य होईल. फक्त देणाराच असेल आणि घेणारा कोणीच नसेल तर व्यवहार अशक्य होऊन जातो. व्यवहारासाठी दोघांची आवश्यकता असते. तसेच कोणतीही गोष्ट, घटना घडण्यासाठी अशा जोड्यांची आवश्यकता असते. या जोड्यांतील दोघांचेही मूळ रूप एकच असते. तेच परब्रह्म नानारूपानी प्रकटलेले आहे, नटलेले आहे. या जगाचा व्यवहार मांडताना त्याला ही सर्व रूपे आवश्यकच होती. पाणी हे जीवन आहे, अमृतमय आहे तर विष हेही जलाचेच एक रूप आहे. ते निसर्गातीलच एक गोष्ट आहे, पण आपल्या संदर्भचौकटीनुसार ते विष आहे. कारण त्यामुळे मृत्यू ओढवतो. पण मूळ स्वरूप आप या पंचमहाभूताचेच आहे. तसे राम हा देव आहे तसा रावण हाही देवच आहे. कारण तेही त्याच ईश्वराचे दुसरे रूप आहे. रामाचे ईश्वरत्व समजायला सोपे जाते. कारण तो सद्गुणांचा समुच्चय म्हणून सांगितले जाते तर रावण हा दुर्गुणांचा समुच्चय सांगितला जातो. पण सद्गुण आणि दुर्गुण (हेही आपल्या संदर्भचौकटीनुसार ठरवलेले असतात.) या दोन्ही या जोड्या परस्पर विरोधी असतात. त्या या जगातीलच असतात आणि त्याची निर्मिती त्याच पूर्ण रूपातून ईश्वरी तत्त्वातून झालेली असते. ईश्वराशिवाय दुसरे काही अस्तित्वातच येणे शक्य नसेल तर मग रावण हाही ईश्वराशिवाय कसा काय अस्तित्वात येऊ शकतो. सर्व त्याचीच रूपे आहेत, मग रावणही त्याचेच रूप ठरते.* 
🙏🏻🙏🏻🕉🔱🚩
*बालवाडीतील मुल जेव्हा अक्षरे शिकते तेव्हा त्याला क, ख इ. सरळ अक्षरे शिकायला सोपे जाते. मात्र जेव्हा जोडाक्षर येते तेव्हा त्याला ते लवकर समजत नाही. त्यासाठी आणखी अभ्यास व्हावा लागतो. अक्षरांची ओळख नीट व्हावी लागते. मग ते जोडाक्षर शिकते आणि मग संपूर्ण वाचन करू शकते. तसेच राम हे ईश्वराचे सरळ अक्षर आहे. तर रावण हे जोडाक्षर आहे. रावण ईश्वर आहे, हे समजायला थोडे जड जाते. त्यासाठी अधिक साधना व्हावी लागते. अनुभवात बदल व्हावा लागतो. दृष्टिकोन बदलावा लागतो. ईश्वरानुभूती यावी लागते. एकदा का ती आली की मग सर्वत्र त्याचेच, त्या एकाचेच दर्शन घडते. मन पवित्र झाले की जगच बदलून जाते. वक्रतेऐवजी ईश्वराची लीला समजू लागते. शत्रूची अगतीकता लक्षात येते. संदर्भचौकटी समोर दिसतात आणि कुणाविषयी रागलोभ संपूण जातात. मन प्रसन्न बनते, चित्तवृत्ती शांत होऊन जातात.  एका वेगळ्या आयामात जीवन सुरू होते. तेव्हा रावणामध्येही तोच दिसतो आणि रामामध्येही तोच दिसतो.* 
🙏🏻🙏🏻🕉🕉🔱🔱🚩🚩
*स्वामी विवेकानंद एके ठिकाणी म्हणाले होते, ‘जग जसे आहे, तसेच आहे. ते सर्वांसाठी सारखेच आहे. मात्र दुष्टास ते नरक वाटते, सुष्टास ते स्वर्ग वाटते आणि पूर्णत्वास पोहोचलेल्यास ते ईश्वरमय वाटते.’ हे नरकमय असलेले जगच ईश्वरमय होऊन जाते. हे जगच ईश्वर बनून त्याचा अऩुभव येऊ लागतो.*   संत तुकारामांनी फार सुंदर वर्णन केलेले आहे, 

*पिकलिया शेंदे कडुपण गेले।*
*तैसे आम्हा केले पांडुरंगे।।*
*कामक्रोधलोभ निमाला ठाईच।*
*अवघी आनंदी वृष्ठी झाली।।*
*आठव नाठव गेला भावा भाव।*
*झाला स्वयंमेव पांडुरंग।।*
*तुका म्हणे भाग्ये या नामे म्हणीजे।*
*संसारी जन्मिजे याचिलागी।।*
🙏🏻🙏🏻🚩🚩
*शेंद म्हणजे शेतात शेंदाड नावाचे वेलीचे फळ असते. ते कच्चे असताना इतके कडू असते की त्याचे कडुपण दीर्घकाळ जीभेवर राहाते. त्याच्यात पूर्ण कडू रस असतो. मात्र जेव्हा ते पिकते तेव्हा त्याच कडूरसाचे रूपांतरण होऊन ते गोड रसात परिवर्तित होते. तोच कडूरस गोड बनतो. हे जे रुपांतरण आहे, ते फार महत्त्वाचे आहे. कडुरसाचा गोड रस बनणे म्हणजे रूपांतरण असते. जीवनातही तसेच आहे. जेव्हा आपले रूपांतरण होते तेव्हा आपल्या आतमध्ये जे काही विकार, विखार असतात, त्याचेच रूपांतरण होऊन तेच देवत्त्वमय होऊन जाते. रावणाचे रूपांतरण रामामध्ये होऊ शकते. कारण मूळ स्वरूप हे ईश्वराचेच आहे.*
🕉🙏🏻🙏🏻🔱🔱
    🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐🙏🏻🚩🚩🚩🚩  *जय जय राम कृष्ण हरि. पांडुरंग हरि.🕉🕉🚩🚩*

No comments:

विठ्ठल

वैष्णव 👏🏻👏🏻💐💐

वैष्णव 💐💐💐 संतांची 'वैष्णव' ह्या शब्दाची व्याप्ती मोठी आहे. भागवतात एकनाथ महाराज लिहितात, 'जाणीव शहाणीव ज्ञातेपण । सांडुनी जा...