नाममाला घे पवित्र । अंति हेचि शस्र ॥


नाममाला घे पवित्र |अंती हेचि शस्र |राम हा महामंत्र |सर्व बाधा निवारी ||१

भवकर्मविख |रामनामी होय चोख |हरेल भवव्यथादुःख |पुढें सुख उपजेल||२||*

माळा घाली हेचि गळां |घे अमृताचा गळाळा |होईल वैकुंठी


सोहळा |रामकृष्ण उच्चारणीं ||३||*

*ज्ञानदेवीं माळा केली |सुखाची समाधि साधिली |जिव्हा उच्चारणी केली |अखंड हरिनाम ||४||*

*भावार्थः-*

        *संसारनाश करणारा नाममंत्र सर्व संसारबाधेची निवृत्ति करणारा आहे .म्हणून तू हातात नाममाळा घे .अरे , नाममाळा हे कर्मांचे नाश करणारे औषधच आहे .||१||*

         *जर ही नाममाळा निर्दोष होईल तर संसारदुःख निवृत्त होऊन परमानंदप्राप्ती होईल .||२||*

           *म्हणून हीच नाममाळा तू गळ्यात घालून परमानंदरूपी अमृताचा गुळणा घे .या नाममाळेने वैकुंठात तुझा जयजयकार होईल .नाममाळा कोणती म्हणशील , तर मोठ्या प्रेमाने व निर्मळ अंतःकरणाने भगवान श्रीहरि रामकृष्ण या नामाचा उच्चार कर .||३||*

       *या नामाचा उच्चार करण्यात जिव्हेचा उपयोग केला , म्हणून मला समाधिसुख प्राप्त झाले , असे श्रीज्ञानेश्वरमहाराज म्हणतात .||४||*

   


*मुक्त होता परी बळे जाला बद्ध!*

*घेऊनिया छंद माझे माझे!!*


*पापपुण्य अंगी घेतले जडून!*

*वर्म नेणे कोण करिता तो!!*


*तुका म्हणे गेले व्यर्थ वायाविण!*

*जैसा मृग सिण मृगजळी!!*



*जीव हा ब्रम्हरूप असल्यामुळे नित्य मुक्त आहे. परंतु माझा देह, माझी इंद्रिये असा त्याला भ्रम झाल्यामुळे,तो बद्ध झाला.*


*पाप पुण्य विचाराने तो बांधला गेला. कारण कर्माचा खरा कर्ता कोण आहे, याचे वर्म त्याला कळले नाही.*


*तुकाराम महाराज म्हणतात, हरीण जसे मृग जळाच्या मागे धाऊन व्यर्थ शिणाते, त्या प्रमाणे प्रपंचातील विषयांच्या मागे धाऊन लोक व्यर्थ शिणतात व दुःखी होतात.*



     

अगा करुणाकरा करितसें धांवा ।

या मज सोडवा लवकरि ।।१।।


ऐकोनिया माझीं करुणेचीं वचनें । 

व्हावें नारायणें उतावीऴ ।।२।।


मागें पुढें अवघा दिसे रिता ठाव । 

ठेवूनि पायीं भाव वाट पाहें ।।३।।


उशीर तो आतां न पाहिजे केला ।

अहो जी विठ्ठला मायबापा ।।४।।


उरलें तें एक हेंचि मज आतां ।

अवघें विचारितां शून्य झालें ।।५।।


तुका म्हणे आतां करी कृपादान ।

पाउलें समान दावी डोळां ।।६।।


*अर्थ:-* हे करुणाकरा, मी तुझा धावा करीत आहे; लवकर ये; आणि संसारबंधनातून मुक्त कर.।।१।।


माझे काकुळतीचे शब्द ऐकून नारायणाने मला भेटण्याविषयी उतावीऴ व्हावे.।।२।।


देवा, तुझ्यावाचून भूत-भविष्य काऴाचा विचार केला असता, सर्व नश्वर आणि ओस असे मला दिसत आहे; म्हणून तुझ्या पायांवर निष्ठा ठेवून तुझी वाट पाहत आहे.।।३।।


अहो विठ्ठला मायबापा, आता मला भेटण्याकरिता तुम्ही उशीर करू नका.।।४।।


आता तुला शरण येणे, तुझे भजन करणे हेच एक कर्तव्य माझ्यापुढे उरले आहे. कारण, विचार करून पाहिले तर जगातील सर्व पदार्थ परमार्थत: अत्यंताभावरूपच आहेत.।।५।।


*पादपद्मी श्रीतुकाराममहाराज* म्हणतात, आता मला कृपादान कर, आणि विटेवर असलेले समचरण दाखव.।।६।।

*॥ रामकृष्णहरि ॥*  🚩🙏🏻

No comments:

विठ्ठल

वैष्णव 👏🏻👏🏻💐💐

वैष्णव 💐💐💐 संतांची 'वैष्णव' ह्या शब्दाची व्याप्ती मोठी आहे. भागवतात एकनाथ महाराज लिहितात, 'जाणीव शहाणीव ज्ञातेपण । सांडुनी जा...