तोचि साधू ओळखावा

तोचि साधू ओळखावा 

भगवंतांनी उद्धवाला " भागवत भक्ती " करायला सांगितली. भागवत भक्ती करणारा भक्त देवाला अतिशय प्रिय असतो. इतका की , तो आणि #भगवंत एकच असतात. *भगवंत भक्ताचा देह होतात आणि भक्त त्यांचा आत्मा बनतो.* इतके दोघे एकरूप होतात. असे संपूर्ण अद्वैत साधण्यासाठी भगवंत उद्धवाला संतसेवा करायला सांगतात. त्याचे महत्त्व असे की , संत सेवा केली की गुरुभेट होते. त्यांच्या उपदेशाने आत्मज्ञान होते व भक्ताचे देवाशी अद्वैत साधले जाते.

आता प्रश्न असा की , साधुपुरुष कसा ओळखायचा ?  त्यावर भगवंत त्याला साधूंची लक्षणे सांगत आहेत. त्यापैकी कृपाळूपणा , अद्रोह , तीतीक्षा हे साधूंचे गुण मागील भागात आपण पाहिले. आता पुढील गुण पाहू ...

भगवंत म्हणाले , " सत्य हे साधुपुरुषाचे पुढील लक्षण आहे. त्यांच्याठायी सत्याला उदार आश्रय मिळतो. सत्यामुळे ते अंतर्बाह्य संतोषी असतात. सामर्थ्यसंपन्न होतात. केवळ सत्य बोलण्यासाठीच त्यांच्या वाचेची हालचाल होते.

अत्यंत पवित्र अंतःकरण हा साधुचा पुढील गुण होय. यामुळे मलाही ते वंद्य होतात.

अनवद्य म्हणजे शुद्धता हा पुढील गुण साधुमध्ये असतो. सर्वाना समदृष्टीने पाहणे हा तू सहावा गुण समज. त्याला सर्व जगत सारखेच दिसते. त्याला सुष्ट दुष्ट एकच वाटतात. जरी निनिराळ्या स्वरूपात नट वावरत असला , तरी मूळ माणूस एकच असतो. तशीच याची जगाकडे पहाण्याची भावना असते.

परोपकार हा पुढील गुण साधुमध्ये असतो. साधू स्वतःला काया वाचा , मनाने उपकार करण्यासाठी आपण आहोत असेच समजतो. तो सर्व जगावर सतत उपकाराचा वर्षाव करत असतो.

आत्मज्ञान प्राप्त केलेले असल्याने त्याची संपूर्ण निर्वासना झालेली असते अमुक एक हवं किंवा अमुक एक नको असं त्याला कधी वाटत नाही."

No comments:

विठ्ठल

वैष्णव 👏🏻👏🏻💐💐

वैष्णव 💐💐💐 संतांची 'वैष्णव' ह्या शब्दाची व्याप्ती मोठी आहे. भागवतात एकनाथ महाराज लिहितात, 'जाणीव शहाणीव ज्ञातेपण । सांडुनी जा...