*याचिया छंदा जे लागले प्राणी*
#याचिया_छंदा_जे_लागले_प्राणी ।
#त्यांची_धुळधाणी_केली_येणे ॥
#याचा_संग_पुरे_याचा_संग_पुरे ।
*अंतरी ते उरे हाव हाव ॥*
*स्वार्थ परमार्था घातलासे चिरा ।*
*किती फजितखोरा बुझवावे ॥*
*न जावे येथे हाडेची जाय ।
*करू नये ते करी स्वये न धरी काही ॥*
*चोखा म्हणे मज तुझीच आण ।*
*होई समाधान घटिका भरी ॥*
*>------> संत चोखामेळा*
*>------> संत चोखामेळा मनाविषयी सांगत आहेत. या अभंगात ते म्हणतात, "या मानाच्या जो नादी लागला त्याची धूळधाण झाल्याशिवाय रहात नाही. या मनाचा संग पुरे झाला. याच्यामुळे साऱ्या गोष्टींची हाव मनात धरून राहते. मी आता स्वार्थ आणि परमार्थ या बाबींना तिलांजली दिली आहे. या फजितखोराला किती आणि कसे आवरावे हेच कळत नाही. हे मन जेथे जाऊ नये तिथे हट्टाने जाते. जे करू नये ते करते. हे विठ्ठला, मला तुझीच आण आहेत. त्यामुळे फळभर का होईना, मनाला समाधान मिळते."*
*>------> हे मन अतिशय चंचल आहे ते कुठल्याही एका जागी स्थिर राहत नाही. मनाच्या चंचलतेमुळे वा मोहमयी वृत्तीमुळे माणसाला अनेक संकटाचा वा विवादांचा सामना करावा लागतो. या मनाला किती आवरण्याचा प्रयत्न केला तरी चौखुर उधळलेल्या घोड्याप्रमाणे ते बेलगाम धावत सुटते. त्याची धाव मोह, माया, ममता, लोभ, विषयकामना याकडे असते. हे षडरिपू माणसाची धूळधाण करतात. आयुष्याचे भाग्यध्येय शुन्यवत करून टाकतात.*
*>-----> मनाविषयी अनेक संतांनी लिहीले आहे. समर्थ रामदासांनी मनाचे श्लोक लिहून मनाला मनोबोध केला. रामायणाची करुणा भाकताना ते म्हणतात,*
अचपळ मन माझे नावरे आवरिता ।
तूझविण शीन होतो
धाव रे धाव आता ॥
*>-----> संत कबीर मनाविषयी लिहीताना म्हणतात,
मन के बहुतक रंग है,*
छिन छिन बदले सोय ।
एक रंग में जो रहे,
ऐसा बिरला कोय ॥ *( मनात भावनांचे अनेक रंग विद्यमान आहेत. ते परिस्थीतीनुसार क्षणाक्षणाला बदलत राहतात. मात्र जे भक्ती, साधना या एकाच रंगात रंगून जाते असे मन अतिशय दुर्मिळ असते. )*
*>----> एका कवीने मनाविषयी लिहीताना म्हटले आहे,*
मन मायेचा पसारा
मन चंचलसा वारा
मन मोहाचे आगर
मन पावसाच्या धारा
*>-----> मन हे वार्याप्रमाणे चंचल असते. जो मनाबरोबर वाहवत जातो त्याची अंती धुळधाण होते. मन माणसाला मोहात पाडते. आपल्या कर्तव्यापासून परावृत्त करते. म्हणून चंचल मनाचा संग नको असे सूत्र संत चोखामेळा यांनी या अभंगाद्वारे मांडले आहे.*
No comments:
Post a Comment