#कै_वहावे_जीवन !!

#कै_वाहावे_जीवन ।
#कै_पलंगी_शयन ॥
*जैसी जैसी वेल पडे* ।
*तैसे तैसे होणे घडे* ॥
*कै भोज्य नानापरी* ।
*कै कोरड्या भाकरी* ॥
*कै वसावे वहनी*।
 *कै पायी अनवाणी* ॥
 *कै उत्तम प्रावणें* ।
 *कै वसने ती जीणें* ॥
*कै सकळ संपत्ती* ।
 *कै भोगणे विपत्ती* ॥
*कै सज्जनांशी संग* ।
 *कै दुर्जनांशी योग* ॥
 *तुका म्हणे जाण* ।
 *सुख दुःख ते समान* ॥
               --- *संत तुकाराम* 
                 *आयुष्यात येणाऱ्या सर्व प्रसंगांना सामोरे जाण्याची आपली तयारी असावी, असे संत तुकाराम सांगत आहेत. या अभंगात ते म्हणतात, "जशी वेळ येईल त्याप्रमाणे वर्तन करावे. कधी नाना प्रकारच्या पदार्थांनी युक्त पंचपक्वानांचे भोजन करावे तर कुठे कोरडी भाकरी खावी. कधी एखाद्या अलिशान वाहनात बसावे, तर कधी अनवाणी पायांनी चालावे. कधी उंची वस्त्रे परिधान करावी, तर कधी जुनीपुराणी फाटके वस्त्र घालावे. कधी संत सज्जनांचा संग करावा, तर कधी दुर्जनांशी सहवास करण्याची वेळ आली तर तो ही सहन करावा. सुखदुःखात समान मानून त्यानुसार आयुष्यात वर्तन करावे*. "
                          *माणसाचे आयुष्य सुखदुःखाच्या काळ्या पांढऱ्या रंगाने बनलेले आहे. आयुष्यात कधी सुखाचे सोनेरी प्रहर येतात, तर कधी दुःखाची काळीकुट्ट रात्र अवतरते. कधी लक्ष्मी पायाशी लोळण घेते, राजयोग लाभून सत्तेचे सिंहासन लाभते, तर कधी अन्नान्नदशा होऊन दारिद्र्याशी मुकाबला करावा लागतो*.
                        *आयुष्यातील चांगल्या वाईट उत्तम आणि निकृष्ट अशा परस्परविरोधी बाबीचे चित्र उभे करून तुकोबारायांनी सर्व प्रसंगात समान वागावे असा हितिपदेश केला आहे*.
                    *सर्वसामान्य माणूस सुख दुखाच्या प्रसंगी आनंदाने बेभान होतो, सुखाने उन्मत्त होतो, तर दुःखाच्या क्षणी गर्भगळीत होऊन जातो. सामान्य माणसाकडे एकूणच संयम वा धैर्याचा अभाव असतो. सुख वा दुःख अशा दोन्ही प्रसंगी तो आपले मानसिक संतुलन राखू शकत नाही. सुख, श्रीमंती,सत्ता, आल्यावर तो सारे काही विसरतो. आपला भूतकाळ, नातीगोती, मित्र, स्नेही या सर्वांचा त्याला विसर पडतो. त्याचे इतरांप्रती असलेले वागणे, बोलणे बदलून जाते. आवाजात मग्रुरी, सत्तेचा उन्माद, अहंकाराचा दर्प त्यांच्या शब्दाशब्दांतून प्रकट होतो. आपल्या अहंकाराच्या कोशात तो बंदिस्त होतो आणि अनेकदा आपल्या अडचणीच्या काळातील आपल्या उपकारकर्त्याला हे तो विसरतो*.
             *मात्र, सुखदुःखाच्या दोन्ही प्रसंगी जो संथ वा शांत राहतो तो संत. आयुष्यात त्यांचा तोल जात नाही. ते सुखाने हुरळून जात नाहीत वा दुःखाने हिम्मत हरत नाही। त्यावर संपत्ती, सत्ता व संगत यांचा कुठलाही परिणाम होत नाही. स्वतःकडे तटस्थपणे पाहण्याची विवेकी दृष्टी संतांच्या ठायी असते. त्यांची प्रज्ञा सर्व अवस्थेत स्थिर असते म्हणून ते स्थितप्रज्ञ*.
     *तुका म्हणे जाण । सुखदुःख ते सामान ॥ या ओळीतील मतितार्थ हाच आहे. समव्रृत्तीच्या गुणाला स्थितप्रज्ञ हे नाव भगवद् गीतेने दिलेले आहे. अंतर्मुख होऊन स्थिर बुद्धीने विवेकपूर्ण चिंतन केले की आपल्याला आपला अंतरीचा सूर गवसतो. मन उन्मनी होते. आपल्या उन्नतीच्या प्रकाशवाटा स्वच्छपणे दिसतात. आयुष्यातील हे महत्त्वाचे सूत्र संत तुकारामांनी या अभंगात सांगितले आहे* .
               -----
👏🏻 #अमोलडोके👏🏻
_*जय जय राम कृष्ण हरि*_

No comments:

विठ्ठल

वैष्णव 👏🏻👏🏻💐💐

वैष्णव 💐💐💐 संतांची 'वैष्णव' ह्या शब्दाची व्याप्ती मोठी आहे. भागवतात एकनाथ महाराज लिहितात, 'जाणीव शहाणीव ज्ञातेपण । सांडुनी जा...