जेथे देखे तेथे तुझीच पाऊले

*🚩🕉️‼️श्री विठ्ठल‼️🕉️🚩*
     *जेथें देखें तेथें तुझींच पाउलें।*
     *विश्व अवघें कोंदाटलें।।*
     *रूप गुण नाम अवघा मेघश्याम।*
     *वेगळें तें काय उरलें।।*
     *जातां लोटांगणीं अवघीच मेदिनी।*
     *सकळ देव पाट झाले।।*
     *सदा सर्वकाळ सुदिन सुवेळ।*
     *चित्त प्रेमें असे धालें।।१।।*

     *अवघा आम्हां तूंच झालासी देवा।*
     *संसार हेवा काम धंदा।।*
     *नलगे जाणें कोठें कांहींच करणें।*
     *मुखीं नाम ध्यान सदा।।२।।*

     *वाचा बोले ते तुझेचि गुणवाद।*
     *मंत्र जप कथा स्तुति।।*
     *भोजन सारूं ठायीं फल तांबोल कांहीं।*
     *पूजा नैवेद्य तुज होती।।*
     *चालतां प्रदक्षिणा निद्रा लोटांगण।*
     *दंडवत तुजप्रति।।*
     *देखोन दृष्टी परस्परें गोष्टी।*
     *अवघ्या तुझ्या मूर्ति।।३।।*

     *झाल्या तीर्थरूप बावी नदी कूप।*
     *अवघें गंगाजळ झालें।।*
     *महाल मंदिरें माड्या तनघरें।*
     *झोंपड्या अवघीं देव देवाइलें(देवालयें)।।*
     *ऐकें कानीं त्या हरिनामध्वनी।*
     *नाना शब्द होत झाले।।*
     *तुका म्हणे आम्ही या विठोबाचे दास।*
     *सदा प्रेम सुखें धालों रे।।४।।*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
     *भावार्थ:-हे देवा,जिकडे मी पाहीन, तिकडे तुझे पाय माझ्या दृष्टीस पडतात. सर्व विश्व तुझ्या योगानें(रुपानें)भरलें आहे. रूप, गुण, नाम हें सर्व तुझें मेघश्यामस्वरूप मला भासत आहे, त्यावांचून दुसरें उरलें नाहीं. मीं कोठें लोटांगण घातलें असतांहि सर्व पृथ्वी देवरूप दिसत आहे; त्या योगानें दिवस,वेळ धन्य होऊन सदा सर्वकाळ माझें चित्त प्रेमानें तृप्त झालें आहे.*
     *हे देवा,चहूंकडे आम्हांला तूंच झाला आहेस; आतां तुझ्यावांचून संसाराची हाव व दुसरा कांहीं उद्योग राहिला नाहीं. आम्हांला कोठे जाणें नको व कांहीं करणें नकों. एका ठिकाणीं बसूनदेखील मुखामध्यें तुझें नाम व चित्तामध्यें तुझें रूप सर्वकाळ धरून राहिलों आहोंत.*
     *जें आम्ही वाचेनें बोलतों, ते तुझे गुणानुवाद व मंत्रजप व कथा आणि तुझी स्तुति होत आहे. एके ठिकाणीं बसून आम्ही जेवूं व फलतांबूलादि पदार्थ सेवन करूं, त्या योगानें तुमची पूजा होऊन तुम्हांला नैवेद्य अर्पण होत आहे; आणि आम्ही वाटेनें चालत असतां तुम्हांला प्रदक्षिणा होत आहे व निजलों असतां दंडाप्रमाणें लोटांगण तुम्हांस होतें. जे कोणी प्राणी आमच्या दृष्टीस पडतात व त्यांच्या आमच्यामध्यें जे बोलणें होतें, ते सर्व तुझें रूप आहे,असे आम्ही मानतो .*
     *विहिरी,व नद्या आड ह्या सर्वांचें पाणी आम्हांस तीर्थरूप प्रत्यक्ष गंगाजल आहे असें वाटतें. चांगले महाल व घरें व गवताच्या झोपड्या हीं सर्व देवालयें आहेत, असें वाटून त्यांत मी देवच पाहातो. नाना प्रकारचे शब्द जरी कोणीं बोलले,तरी तो हरिच्या नामाचा ध्वनिच मला ऐकूं येतो. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हीं ह्या विठोबारायाचे दास झाल्यामुळें सदा सर्वकाळ प्रेमानें तृप्त झालों आहोंत.*

   *🌹🌹🌹शुभ सकाळ🌹🌹🌹*

   *⛳⛳🙏🏻राम कृष्ण हरि🙏🏻⛳⛳*

    *💐💐🙏🏻पांडुरंग हरि🙏🏻💐💐*

*🚩🚩संकष्ट चतुर्थी च्या आपणास अनंत हार्दिक शुभेच्छा!🚩🚩*

No comments:

विठ्ठल

वैष्णव 👏🏻👏🏻💐💐

वैष्णव 💐💐💐 संतांची 'वैष्णव' ह्या शब्दाची व्याप्ती मोठी आहे. भागवतात एकनाथ महाराज लिहितात, 'जाणीव शहाणीव ज्ञातेपण । सांडुनी जा...