तुळसीमाळा घालूनि कंठी |
उभा विटेवरी जगजेठी |
अवलोकोनी पुंडलिका दृष्टी |
असे भीमातटीं पंढरीये ||१||
भुक्ति मुक्ति जयाच्या कामारी |
ऋध्दीसिध्दी वोळगती द्वारीं |
सुदर्शन घरटी करी |
काळ कांपे दुरी धाकें तया ||२||
जगज्जननी असे वाम भागीं |
भीमकी शोभली अर्धांगीं |
जैसी विद्युल्लता झळके मेघीं |
दर्शनें भंगी महा दोष ||३||
सुखसागर परमानंदु |
गोपी गोपाळां गोधनां छंदु |
पक्षी श्वापदां जयाचा वेधु |
वाहे गोविंदु पावा छंदें ||४||
मुखमंडित चतुर्भुजा |
मनमोहन गरुडध्वजा |
तुका म्हणे स्वामी माझा |
पावें भक्तकाजा लवलाहीं ||५||
भावार्थ -
पंढरीत चंद्रभागेच्या तीरावर गळ्यात तुळशीच्या माळा घालून पुंडलिकाकडे पाहात जगत्श्रेष्ठ पांंडुरंग विटेवर उभा आहे .||१||
भुक्ती आणि मुक्ती ह्या ज्याच्या काम करणाऱ्या दासी आहेत , ऋध्दी आणि सिध्दी ह्या दारात उभ्या राहून ज्याची सेवा करतात , ज्याचे सुदर्शनचक्र पंढरीच्या भोवती फिरत आहे ; आणि त्याच्या भयाने काळ दूर उभा राहून थरथर कापत आहे .||२||
जगज्जननी रुक्मिणी ज्याची अर्धांगी असून ती ज्याच्या वामभागी शोभत आहे .मेघात जशी वीज चमकावी , त्याप्रमाणे मेघःश्याम श्रीहरीच्या जवळ गौरवर्णीय रुक्मिणी झळकत आहे .||३||
हा हरी सुखाचा सागर व परमानंदरूप आहे .गोकुळात असताना या हरीचा गोपी , गोपाळ , गोधनें , पशु ,पक्षी यांना छंद लागला होता .कारण , हा गोविंद वेणु वाजवून सर्वांना आपला छंद लावीत होता .||४||
तुकाराम महाराज म्हणतात , ज्याचे मुख सुंदर असून ज्याला चार बाहू आहेत , ज्याच्या ध्वजावर गरुडाचे प्रतीक असून जो भक्तांच्या मनाला मोहित करणारा आहे , असा स्वामी भक्तकार्यार्थ तातडीने धावत जातो .||५||
||जय विठ्ठल ||जय तुकोबाराय ||
*फळ पिके देंठीं।*
*निमित्य वारियिची भेटी।।१।।*
*हा तो अनुभव रोकडा।*
*कळों येतो खरा कुडा।।२।।*
*तोडलिया बळें।*
*वांया जाती काचीं फळें।।३।।*
*तुका म्हणे मन।*
*तेथें सकळ कारण।।४।।*
*भावार्थ:-कोणतेंहि फळ देंठाचे ठिकाणीं पक्वदशेला आलें म्हणजे त्याला खालीं पडण्यास एक वाऱ्याची झुळूक पुरी होते.*
*हा सर्वांना प्रत्यक्ष अनुभव आहे,तो खरा किंवा खोटा हें सहज समजतें.*
*पक्व दशेस न येतां कच्चीं फळे जर तोडलीं तर तीं नासून वायां जातात.*
*तुकाराम महाराज म्हणतात,आपल्या एका मनाचे योगानेंच सर्व कार्यसिध्दि होते (धर्माच्या आणि भक्तीच्या योगानें स्थिर झालेल्या मनाला हरि-गुरु-कृपेचें निमित्त मिळालें कीं आत्मसाक्षात्कार होतो; आणि स्वैराचारी मन कच्च्या फळाप्रमाणें फुकट जातें. आपलें मनच कार्यसिध्दिला कारण होतें.).*
*🌹🌹🌹शुभ सकाळ🌹🌹🌹*
*⛳⛳🙏🏻राम कृष्ण हरि🙏🏻⛳⛳*
*💐💐🙏🏻पांडुरंग हरि🙏🏻💐💐*
No comments:
Post a Comment