बुध्दिहीना उपदेश
बुद्धीहीना उपदेश ।
ते ते विष अमृती ॥
हुंगो नये गो-हवाडी ।
येथे जोडी विटाळ ॥
अळसियाचे अंतर कुडे ।
जैसे मढे निष्काम ॥
तुका म्हणे ऐशा हाती ।
मज श्रीपती वाचवा ॥
>-----> संत तुकाराम
>------> संत तुकाराम अाळशी आणि बुद्धीहीन माणसाविषयी सांगत आहेत. आळशी आणि बुद्धीहीन असणारा माणुसही जगतो. प्रत्येकाला आपले आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. मात्र, प्रत्येकाची जगण्याची पद्धत वेगळी असते. बुद्धीहीन माणूस विचार करत नाही तो विचार करीत नाही. जो विचार करत नाही, त्याला केलेल्या उपदेशाचा अर्थ कसा उमगणार ? उपदेश म्हणजे अनुभवाचे सार असते. विचारांचे नवनीत असते. आयुष्यात आलेल्या असंख्य अनुभवातून सांगण्याजोगे चिंतनात्मक सार असते, ते म्हणजे उपदेश. या विचार मंथनातून आलेल्या अमृतधारा असतात. मात्र बुद्धीहीन माणसाला उपदेश करणे म्हणजे या अमृतात विष कालवण्यासारखे आहे. इतरांनी केलेला चांगला उपदेशही हा कडू वाटू लागतो. म्हणून बुद्धीहीन माणसाला उपदेश करण्याच्या भानगडीत पडू नये. बुद्धीची वाणवा असलेला हा माणूस विचार करीत नाही, अनुभवातून काही शिकत नाही. आयुष्यभर तेच तेच करीत राहतो आणि पुन्हा पुन्हा ठोकर खात राहतो. त्याला काही कळत नाही. मात्र, त्याच्या ठायी अज्ञानाचा अहंकार ठासुन भरलेला असतो. असा अहंकारी माणूस विचार करीत नाही. इतरांनी केलेला हितोपदेश ऐकण्याचीही त्याची मानसिक तयारी नसते.
>-----> आळस हा शरीराचा नव्हे, तर मनाचा दुर्गुण आहे. आळस मनात असतो. मग तो शरीरात उतरतो. आळशी माणुस म्हणजे निर्जीव प्रेत असते. असे तुकोबाराय म्हणतात. प्रेत निर्जीव असते. कुठलीही हालचाल करीत नाही. आळशी माणसाचे तसेच असते. अाळशी माणूस वाया गेलेल्या बहुमोल वेळेचीही फिकीर करीत नाही. आयुष्यात गती महत्त्वाची असते. "थांबला तो संपला" असे जे वचन अाहे, त्याचा मतीतार्थ हाच आहे. व्यवहाराप्रमाणेच अध्यात्मातही चालणे महत्त्वाचे असते. या वाटेवर आरंभी कसोटीच्या काळात एक अंधारी रात्र (डार्क नाइट) भक्तांच्या आयुष्यात येतेच. आत्मचिंतन आणि आत्मशोध करता करता ही वाटचाल निष्ठेने आणि नेटाने करावी लागते. संतांनी आपल्या भक्तिमार्गात अनेक चढ-उतार अनुभवले. स्वतःच्या मनातील काळोखाशी कठोरपणे संघर्ष केला आणि त्यातून संवादाची प्रकाशकिरणे दिसली. अध्यात्म हे कार्यप्रवण असणाऱ्या कर्मयोगी माणसासांठी आहे. हे अाळशी लोकांचे क्षेत्र नाही. अनेक विकारांच्या अडथळ्यांचे पर्वत पार करून जो जिद्दीने पुढे जातो, तोच आत्मविकासाच्या शिखरावर पोचतो. संत आणि सुज्ञ लोकांना हे सत्य उमगलेले असते. म्हणूनच ते आयुष्यात महान वा श्रेष्ठ पदावर पोचतात. हे सर्व इंगित बुद्धीहीन वा आळशी माणसाला कळत नाही. हे समजून घेण्याचा तो प्रयत्नही करीत नाही. घरात गंगा अवतरली तरी त्याचे त्याला आकलन होत नाही. म्हणूनच अशा माणसाला सज्जनांनी उपदेश करण्याच्या भानगडीत पडू नये, असे संत तुकाराम म्हणतात. एवढेच नव्हे, तर अशा लोकांना उपदेश करण्यापासून मला वाचव, अशी ते परमेश्वराला विनंती करतात.
>-----> संतांचे हे "सावधपण" आपल्या आयुष्यात आचरणात आणले तर अनेक तापदायक प्रसंग टळु शकतात. संतांनी अध्यात्माचे तत्त्व सांगता सांगता जीवनोपयोगी व्यवहारशास्त्रही सांगितले आहे.
>------> अमोल डोके*
No comments:
Post a Comment