बळीवंत कर्म ॥
करी आपुला तो धर्म ||१||
पुढे घालूनियां सत्ता ॥
न्यावे पतना पतिता ||२||
आचरणे खोटी ॥
केली सलताती पोटी ||३||
तुका म्हणे देवा॥
नाही भजन केली सेवा||४||
भावार्थ:-माझे प्रारब्ध म्हणजेच माझे कर्म एवढे बलवान आहे, एवढे बळिवंत आहे की ते वेळोवेळी आपला स्वधर्म आचरून आम्हांला पीडा देण्याचे काम करतात, पदोपदी आमच्या उद्धाराच्या मार्गात आडवी येतात. हवे तेव्हा आपली सत्ता प्रस्थापित करून ती मग आमच्यासारख्या आधीच पापी असलेल्या पतनांना मग अजूनच आडमार्गाला नेतात किंवा नेण्याचे काम करतात आणि त्याद्वारे अजूनच आमचे अधःपतन घडवून आणतात.त्यामुळे आमच्याकडून जे चुकीचे वर्तन झाले आहे, जी खोटी आचरणे घडली आहेत ती आता आम्हालाच सलत आहेत, आमचे प्रारब्ध अजूनच बळकट होऊन त्याचे भोगदेखील आम्हांला भोगावयास लागत आहेत. त्यामुळे आमच्या पोटी त्याचा चांगलाच पश्चाताप होत आहे.म्हणुन जगद्गुरु तुकोबाराय शेवटी म्हणतात की देवा, हे श्रीहरी आम्ही तुमचे भजन केले नाही, तुझे नाम घेतले नाही, म्हणजेच तुझी काहीही सेवा केली नाही त्यामुळेच आमच्या नशिबी असे हे भोग आले आहेत.
धावे माते सोई।
बाळ न विचारता काही।।१।।
मग त्याचे जाणे निके।
अंग वोडवी कौतुके।।२।।
नेणें सर्प दोरी।
आगी भलते हाती धरी।।३।।
तीविणे ते नेणे।
आणीक काही तुका म्हणे।।४।।
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
भावार्थ:-बालक हे आपल्या आईस पाहून तिच्याकडे धाव घेते तेव्हा उंचवट्यावरून मी खाली पडेन हे ज्ञान त्या बालकास नसते.
मग ती मातोश्री त्याचे बऱ्याकरितां हातचे काम टाकून कौतुकाने त्याचें रक्षण करते.
ते बालक सर्प,दोरी किंवा अग्नि हे कांही जाणत नाही, म्हणून भलताच पदार्थ हाती धरते.
तुकाराम महाराज म्हणतात,एका मातोश्रीवाचून ते आणखी काही जाणत नाही (त्याप्रमाणे आत्मसाक्षात्कारी भक्ताने बालभावाने जगात राहावे,म्हणजे देव, मातेप्रमाणे,त्याचा सांभाळ करतो).
🌹🌹🌹जय जय राम कृष्ण हरि🌹🌹🌹
*⛳⛳🙏🏻राम कृष्ण हरि🙏🏻⛳⛳*
*💐💐🙏🏻पांडुरंग हरि🙏🏻💐💐*
No comments:
Post a Comment