कवण स्तुति करु कवणिया वाचे

*कवण स्तुती करु कवणिया वाचे*       

*कवण स्तुती करू कवणिया वाचे ।*
*ओघ संकल्पाचे गिळिले चित्ते ॥*
*मन हे झाले मुके मन हे झाले मुके ।*
*अनुभवाचे हे सुख हेलावले ॥*
*दृष्टीचे पाहणे परतले मागुती ।*
*राहिली निवांत नेत्रपाती ॥*
*म्हणे गोरा कुंभार मौन्य सुख द्यावे ।*
*जीवे ओवाळावे नामयासी ॥*      
                   *>------>      संत गोरा कुंभार*         *>------>        या अभंगात संत गोरा  कुंभार म्हणतात,   "हे विठ्ठला, मी तुझी स्तुती कशी करू ?  कुठल्या वाणीने करू  ?   मी केलेले सारे संकल्प माझ्या मनाने गिळून टाकले आहेत.  माझे मन मुक झाले आहे.  तुझ्या भक्तीप्रेमाच्या नितांत अनुभवाने मला सुख लाभले आहे.  या सुखाने मी  हेलावून गेलो आहे.  माझ्या डोळ्याच्या पापण्या निश्चल झाल्या आहेत.  मौनरूप होऊन या सुखाचा अनुभव घ्यावा आणि नामदेवांना जिवेभावे ओवाळावे असे वाटते."*      
  *>------>     संत नामदेव हे वारकरी भक्तिमार्गातील प्रमुख संघटक. त्याने विविध जाती-जमातीतील संतांची मांदियाळी जमवली आणि भक्तीमार्गाला वेगळे वळण दिले. मंदिरात बंदीस्त असलेली कीर्तनपरंपरा त्यांनी खुल्या वाळवंटात आणली.  भक्तिमार्गात असलेला बंदिस्तपणा वा कृत्रिम बंधने त्यांनी तोडून टाकली या भक्तीचे अंगण सर्वांना खुले केले.    "या रे या लहान-थोर" ही वारकरी पंथाची भूमिका आहे. येथे जातपात, पंथ, गरीब-श्रीमंत, श्रेष्ठ-कनिष्ठ, काळा-गोरा असा कुठलाही भेद नाही. संतांनी वेद मानले,  पण त्यातील भेद अमान्य केले. परंपरतले चांगले, मानवताप्रधान तत्त्वेच त्यांनी स्वीकारली. माणसा-माणसात भेद करणारी रूढी नि परंपरा त्यांनी नाकारली*.   
   *>------->     संत नामदेव हे अवघ्या संतमेळ्याचे अर्ध्वयू. त्यांनी विठ्ठल भक्तीपरंपरा गुजरात, राजस्थान आदीपासून थेट पंजाबपर्यंत नेली.  तात्कालीन परंपरेचे नियम बाजूला ठेवून भारतभ्रमण केले आणि भक्तीचा रंग भाषा-प्रांत-पंथ यांच्या पार आहे, हे तत्व भारत खंडात रुजविले.   कीर्तनाच्या माध्यमातून लोकजागृती करून     "नाचू कीर्तनाचे रंगी ।  ज्ञानदीप लावू जगी ॥"  हे आपले आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक ध्येय साध्य केले.*         
*>------>     संत गोरा कुंभार हे वारकरी संतांच्या मांदियाळीतील सर्वात ज्येष्ठ संत. ते सर्वांचे गोरोबा काका.  त्यांचा पारमार्थिक अधिकार मोठा होता. त्यानी प्रपंच करून परमार्थ केला. नव्हे, प्रपंचच परमार्थमय केला.*       
   *>------->      विठ्ठलानुभूतीचा साक्षात्कार झाल्यावर शब्द मौनावले. स्तुती वा गुणगाण कुणी कुणाचे गायचे असा प्रश्न पडला. त्यांचा व्यवसाय कुंभाराचा.  कुंभार फिरत्या चाकावर माती ठेवून त्याला घटाचा आकार देतो. माणसाचे शरीर हाही एक घट आहे.  घटाच्या पोकळीत अवकाश असतो.  त्यात  आकारतत्त्व सामावलेले असते. अाकारातत्व म्हणजे निर्गुण, निराकार ईश्वरीतत्त्व. मानवी घटातही हे तत्त्व सामावलेले असते.  हे शाश्वत सत्य उमगले की वाणी मौन होते. या मौनातच ईश्वरमय सुखाचा अनुभव घ्यावा, असे संत गोरोबा म्हणतात.*       
 *>------>       हा अत्युच्च अनुभव घेत असतानाही आपल्याला संतपदाची संथा  देणाऱ्या आपल्या गुरू नामदेवांना ते विसरत नाहीत. हा विनय, लीनता आणि कृतज्ञता विलोभनीय आहे.  संतांचे संतपण म्हणतात ते हेच*.  
    *>------>     अमोल डोके*

1 comment:

Unknown said...

रामकृष्ण हरि

विठ्ठल

वैष्णव 👏🏻👏🏻💐💐

वैष्णव 💐💐💐 संतांची 'वैष्णव' ह्या शब्दाची व्याप्ती मोठी आहे. भागवतात एकनाथ महाराज लिहितात, 'जाणीव शहाणीव ज्ञातेपण । सांडुनी जा...