साखरेच्या गोण्या बैलाचिये पाठी ।

साखरेच्या गोण्या बैलाचिये पाठी । 
तयासी सेवटीं करबाडे ।।१।।
मालाचे पैं पेटे वाहाताती उंटें । 
तयालागीं कांटे भक्षावया ।।धृ।।
वाउगा हा धंदा आशा वाढविती । 
बांधोनिया देती यमा हातीं ।।२।।
ज्यासी असे लाभ तो चि जाणे गोडी । 
येर ती बापुडीं शिणलीं वांयां ।।३।।
तुका म्हणे शहाणा होईं रे गव्हारा । 
चौऱ्यासीचा फेरा फिरों नको ।।४।।
--->
      बैल पाठिवर साखरेच्या गोण्या वाहून नेतो, पण त्याला शेवटी कडबाच खायला मिळतो.
    ऊंट मालाचे पेटारे वाहून नेतो पण त्याला काटेच खायला लागतात.
      हा वावगा धंदा उगाच वाढती आशा, अभिलाषा  निर्माण करतो, आणि माणसाला बद्ध करुन यमाहाती सोपवतो. 
    ज्याला लाभ चाखायला  मिळतो त्यालाच त्याची गोडी कळते, बाकीचे उगाचच शिणतात. तुकाराम महाराज म्हणतात, "अरे, मूर्खा, अडाण्या तु शहाणा हो, चौऱ्यांशीच्या फेऱ्यात फिरु नको.
  जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या काळी जे पोंगे वैदिक पंडित होते त्यांना उद्देशून जगद्गुरू तुकाराम महाराजांनी हा अभंग लिहिलेला आहे. वेदात जी अद्वैताची संकल्पना मांडलेली आहे, तिच्याइतकं उच्च समतेचं तत्वज्ञान जगाच्या पाठीवर दुसरं कोणतंही नाही. एका ब्रह्म तत्वापासूनच सर्व चराचर निर्माण झालं असल्याने या चराचराचं बाह्य स्वरुप काहीही असो पण त्यातलं ब्रह्म एकच आहे. आणि म्हणून चराचरात अभेद आहे असं जे तत्वज्ञान त्याला ब्रह्मज्ञान म्हटलं जातं. पण हे सर्वोच्च समतेचं तत्वज्ञान ज्या भूमीत निर्माण झालं त्याच भूमीत या तत्वज्ञानाच्या संपूर्ण विरोधी अशी वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था निर्माण झाल्या. सुरुवातीला सर्व समाज चार वर्णात आणि नंतर दोन वर्णात आणि असंख्य जातीजमातीत विभागला केला. समाजाच्या अक्षरशः चिरफाळ्या उडाल्या. प्रत्येक जात दुसऱ्या जातीचा द्वेष, मत्सर करु लागली. पुराणात परशूरामाची कथा आहे. आपल्या बापाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी परशूरामाने एकवीस वेळा संपूर्ण पृथ्वी नि:क्षत्रिय करण्याची प्रतिज्ञा केली. आणि अतिशय क्रूर पद्धतीने त्या प्रतिज्ञेची पूर्ती केली. त्याने सर्व क्षत्रिय पुरुष  तर ठार मारलेच, क्षत्रियांची लहान लहान मुलं तर ठार मारलीच, पण ज्या क्षत्रिय स्त्रीया गर्भार होत्या त्यांची पोटं चिरुन, पोटातले गर्भही मारले असं सांगितलं जातं. असं त्याने एकवीस वेळा केलं असं सांगितलं जातं. एकदा सर्व क्षत्रिय नष्ट झाल्यावर पुन्हा वीसवेळा क्षत्रिय कसे निर्माण झाले असतील? असा प्रश्न विचारी माणसाला पडू शकतो. त्याचं उत्तर असं सांगितलं जातं की सर्व क्षत्रिय पुरुष नष्ट झाल्यावर मागे फक्त क्षत्रिय स्त्रीया राहिल्यात. त्या कामविव्हळ झाल्या. ब्राह्मणांकडे गेल्या. ब्राह्मणांपासून त्यांना गर्भ राहिले. पुन्हा त्याने त्या सर्वांची हत्या केली. असं वीस वेळा केलं. पुरुषप्रधान व्यवस्थेत क्षेत्र-बीज न्यायाने, अपत्याला बापाचा वर्ण वा जात मिळते. याचा अर्थ परशुरामाने एक वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली, तर वीस वेळा त्याने ब्राह्मणांचीच हत्या केली. वीसवेळा ज्याने ब्राह्मणांचा इतक्या व्यापक प्रमाणात नरसंहार केला त्याला ब्राह्मण संमेलनातून मिरवलं जाणं, त्याचा अभिमान बाळगणं हे अक्कलशून्यतेचंच लक्षण म्हणायला हवं. पण तो भाग बाजूला ठेवू. पण या सिद्धांताच्या आधारे पृथ्वीवरुन क्षत्रिय वंश नष्ट झाल्याचं सांगून कलियुगात फक्त ब्राह्मण आणि शूद्र हे दोनच वर्ण शिल्लक असल्याचं सांगण्यात आलं. असं वास्तवात घडू शकतं यावर एखादा मूर्खच विश्वास ठेऊ शकेल. पण या कथेतून ती रचणाऱ्याच्या मनात क्षत्रियांविषयी किती पराकोटीचा द्वेष आणि तिरस्कार भरलेला असेल त्याचं दर्शन घडतं. पुराणातला ब्राह्मण-क्षत्रिय संघर्ष या विषयात आता शिरायला नको. पण चातुर्वर्ण व्यवस्थेचं द्विवर्ण व्यवस्थेत कसं रुपांतर झालं हे समजावं म्हणून हा सगळा इतिहास सांगितला. अशी व्यवस्था निर्माण झाल्यावर मनुस्मृतीनुसार, जी खरं तर भृगुस्मृती आहे, ब्राह्मण पुरुष सोडून इतर सर्वांवर ज्ञानबंदी लादण्यात आली. त्याकाळात वेद, पुराणं हेच ज्ञान समजलं जात होतं. शूद्रांना वेदाध्ययनाचा अधिकार नाकारण्यात आल्याने फक्त ब्राह्मणच वेद वाचत होते, घोकत होते, पाठ करत होते आणि इतरांना सांगत होते. साहजिकच वेदातलं तत्वज्ञान फक्त ब्राह्मणांनाच शिकायला मिळत होतं. तसं ते शिकत होते. मुखोद् गत करत होते. आणि त्या पाठांतराच्या बळावर ते स्वतःला ज्ञानी, ब्रह्मज्ञानी म्हणवून घेत होते. आपलीच आपण पाठ थोपटून घेत होते. पण ग्रंथ पाठ केल्याने कोणी ज्ञानी होतो हेच जगद्गुरू तुकाराम महाराजांना मान्य नाही. जे घोकलं आहे ते पचवलं आहे वा नाही याची साक्ष त्या व्यक्तीच्या वर्तनावरुन मिळते. स्वतःला ब्रह्मज्ञानी म्हणवणारे ब्राह्मण त्या ज्ञानाचा गर्व करत होते. आम्ही ब्रह्मज्ञानी आहोत म्हणून आम्ही इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत, बाकी सर्व आमच्यापुढे तुच्छ आहेत असं म्हणत होते. ज्यांना मनुस्मृतीच्या कायद्यामुळे ज्ञानाची संधी नाकारली गेली, ज्यांच्यावर अज्ञान लादलं गेलं त्यांना हिणवत होते. आपलं पुस्तकी, शाब्दिक ज्ञान हेच फक्त ज्ञान आहे अशी घमेंड बाळगत होते. तुकाराम महाराजांसारख्या महाप्रज्ञावंत युगपुरुषालाही कुणबी म्हणून हिणवत होते. शूद्राला लिहिण्याचा अधिकार नाही या सबबीखाली तुकाराम महाराजांचे अभंग बुडवण्याची शिक्षा त्यांना देण्यात आली. छळण्यात आलं. हे छळणारे जर खरोखरच ब्रह्मज्ञानी असते तर त्यांनी असा भेद केला नसता. कारण ब्रह्मज्ञान म्हणजे सर्वांभूती ब्रह्म, सर्वांभूती समत्व पहाणं. इतके ग्रंथ वाचून, घोकूनही जर हे ज्ञान होत नसेल तर त्या घोकंपट्टीचा फायदा काय? त्या ज्ञानाचा अर्थ घोकणाऱ्यांना कळलाच नाही असा त्याचा अर्थ आहे. बैल आपल्या पाठीवर साखरेच्या गोण्या वाहून नेतो पण त्याला त्या साखरेची चव कधीच कळत नाही. तो शेवटी कडबाच खातो. ऊंटाच्या पाठीवरून मालाचे पेटारे वाहून नेले जातात, पण तो माल ऊंट खात नाही. तो काटेच खातो. तसेच हे अहंकारी, दांभिक लोक ब्रह्मज्ञानाचं म्हणजे त्या शब्दांचं ओझं एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत वाहतात, पण ते ज्ञान ते आपल्या जीवनात उतरवत नाहीत. ते जे बोलतात तसे वागत नाहीत. म्हणून त्यांना तुकाराम महाराज ओझेवाहू बैलाची, ऊंटाची उपमा देतात. 
     आजही वारकरी संप्रदायात काही कीर्तनकार, प्रवचनकार असे आहेत की ते  ज्ञानबा-तुकोबांचं नाव घेतात, माऊलीचं पसायदान गातात, चराचरात परमेश्वर भरला आहे सांगतात आणि कीर्तनातून धर्मांधतेचा, परधर्मद्वेषाचा प्रचार करतात.  याचा अर्थ या लोकांना संतांचा विचार, संतांची शिकवण समजलीच नाही. त्यांनी ज्ञानेश्वरी तोंडपाठ केली असली, संपूर्ण गाथा त्यांचा तोंडपाठ असेल, कुठला अभंग कोणत्या पानावर आहे तेही ते क्षणात सांगू शकत असतील, पण तुकोबारायांचा *"अवघी एकाचि च विण ।"* ही शिकवण जर त्यांच्या ,डोक्यात शिरली नसेल, त्यांच्या वागण्याबोलण्यातून या शिकवणूकीचा प्रत्यय येत नसेल तर ते तुकाराम महाराजांच्या शब्दात ओझ्याचे गाढव आहेत, ओझ्याचे बैल आहेत, ओझेवाहक ऊँट आहेत. हे ओठांनी संताचे शब्दरुपी अमृत सांगतात आणि खाताना शेण खातात. कुत्र्यापुढे खीर आणि उलटी असली तर ते खीर सोडून उलटीच चाटतं तशी या लोकांची अवस्था आहे. संतांचा अमृतोपदेश दुर्लक्षित करुन हे घाणीत तोंड घालतात. यांची गत त्या पोथीपंडितांसारखीच झाली आहे हे ब्रह्मज्ञानाच्या गप्पा मारतात आणि माणसामाणसात भेदाभेद करतात. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात, *"साकरेच्या गोण्या बैलाचिये पाठी । तयासी सेवटीं करबाडे ।।"* 
*"मालाचे पैं पेटे वाहाताती उंटें । तयालागीं कांटे भक्षावया ।।"*
    पुढील चरणात तुकाराम महाराज म्हणतात, *"वाउगा हा धंदा आशा वाढविती । बांधोनिया देती यमा हातीं ।।"* हे लोक देवाच्या, धर्माच्या नावावर हा जो पोट भरण्याचा धंदा करतात त्यातून त्यांचं पतन होत असतं. कुत्र्यापुढे शिळे तुकडे टाकून त्याला पाळावं आणि त्या कुत्र्याने मग तुकडे टाकणारा सांगेल त्यावर धावून जावं, भुंकावं असे काही लोक संप्रदायात शिरले आहेत. त्यांच्यापुढे कुठल्यातरी जातीयवादी, सनातनी संघटना वा व्यक्ती फालतू पदांचे तुकडे टाकतात. अमक्या अमक्याचं अध्यक्षपद, तमक्याचं सचिवपद, फलाण्याचं उपाध्यक्षपद आणि तेवढ्यावरच हे हुरळून जातात. संतविचार बाजूला सारतात आणि जातीयवाद्यांचं, धर्मांधांचं, सनातन्यांचं खरकटं वारकरी मंचावरुन चघळतात. सामान्य साध्याभोळ्या वारकऱ्यांची दिशाभूल करतात. असे लोक स्वतः तर नरकात जातातच पण सामान्य लोकांनाही त्या वाटेने फरफटत नेतात.
   बाबा महाराज सातारकरांचं एक कीर्तन यू-ट्यूबवर  ऐकत होतो. बाबा महाराज सांगत होते, *"अवघी एकाचि च विण ।"* तुकोबारायांनी सांगितलं आहे. घरात केलं कोणी परजातीत लग्न तर करु द्या. कारण हे भेद खोटे आहेत. *"अवघी एकाचि च विण।"* आहे. जन्माने कोणी श्रेष्ठ ठरत नाही. कर्माने श्रेष्ठ ठरतो. जगताना प्रत्येकाला वेळप्रसंगी बुद्धी, शक्ती, व्यवहार आणि सेवाभाव यांचा उपयोग करावा लागतो.   एकाच माणसात ब्राह्मण असतो, क्षत्रिय असतो, वैश्य असतो आणि शूद्रही असतो. म्हणून कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही, सर्व समान आहेत. बाबा महाराज सातारकर हे तुकाराम महाराजांचे खरे वारस आहेत असं यावरून लक्षात येतं.  त्यांना संतविचार उमगला, समजला आहे. पण इतर कित्येक महाराज तुकाराम महाराजांच्या अभंगांचा वापर फक्त चवीपुरता करतात. तुकाराम महाराजांच्या नावाखाली भलतंच काही सांगत असतात. संतांनी समाजातले जातीभेद, धर्मभेद, स्त्री-पुरुष भेद नाकारले. गरीब-श्रीमंत भेदाला नकार दिला. प्रतिष्ठित-अप्रतिष्ठीत, ज्ञानी-अज्ञानी असे भेद नाकारले. सकलांसी समान जन्मसिद्ध अधिकार असल्याचं घोषित केलं. *"कबीर, लतिफ, मोमीन मुसलमान । सेना न्हावी जाण विष्णुदास ।।"* असं तुकाराम महाराज सांगतात. मांसाहार निषिद्ध मानणाऱ्या संप्रदायाचा देव असलेला आमचा विठोबा संत सजन कसाई यांना मांसही तुळू लागतो. आणि स्वतःला सांप्रदायिक म्हणवणारे मात्र हिंदू-मुसलमान असं द्वैत उभं करतात. हिंदू खतरे में हैं असं सांगतात. शेकडो वर्षे इथे मोगल, आदिलशहा, कुतुबशहा यांनी राज्य केलं तेंव्हा हिंदू धर्म धोक्यात नव्हता? आता तर बहुसंख्यांक हिंदूच सत्तेत असताना हिंदू धर्म धोक्यात कसा येईल? इस्लामला संगीताचं वावडं असताना, अनेक मुस्लिम संतांनी टाळ, चिपळ्या हाती घेतल्या आणि विठ्ठलाची भक्ती केली. आपल्या धर्मातल्या कर्मकांडाचा त्याग केला. वारकऱ्यांत अनेक मुस्लिम स्त्री-पुरुष संत होवून गेले. श्रीगोंद्याचे शेख महंमद तर स्पष्ट शब्दात सांगतात, *"शेख महंमद अविंध । त्याचे ह्रदयी गोविंद ।।"* मी मुस्लिम असलो तरी माझ्या ह्रदयात गोविंद आहे. शिवरायांचे आजोबा मालोजीराजे शेख महंमदांना आपले गुरु मानत. मालोजीराजेंनीच शेख महंमदांना श्रीगोंद्याला आणून वसवलं. त्यांना इमान दिलं. शिवराय ज्यांचा आदर करत अशातलं एक नाव बाबा याकूत होतं. शिवरायांच्या लष्करात किती निष्ठावंत मुस्लिम मावळे होते ते आता सर्वांना माहिती झालं आहे. स्वराज्याच्या एकून सैन्यात सुमारे तीस टक्के मुस्लिम होते. ते शिवरायांसाठी, स्वराज्यासाठी लढले आणि त्याचसाठी त्यांनी प्राणही दिले. हा सर्व इतिहास जगजाहीर असताना, ज्ञानबा-तुकोबांचं नाव घेत ही नतद्रष्ट सनातनी मंडळी परधर्मद्वेष पसरवते. एकीकडे मुस्लिम, ख्रिश्चन यांचा द्वेष पसरवायचा. दुसरीकडे बौद्धांचा द्वेष पसरवायचा. तिसरीकडे शीखांचा द्वेष पसरवायचा. चौथीकडे हिंदूअंतर्गत, सवर्ण विरुद्ध अवर्ण, मराठा विरुद्ध इतर मागास समाज, मराठा विरुद्ध दलित, हे विरुद्ध ते भांडणं लावून द्यायची. कशासाठी? तर काही जातीयवाद्यांनी यांच्यापुढे काही पदांचे तुकडे टाकले, ते खोटंखोटं का होईना यांना मोठेपणा देतात म्हणून ! ही पदं, हा फुकटचा मोठेपणा त्यांना नरकात नेईल हे या लोकांना समजत नाही.
    आपल्या संतांनी अखिल मानवतेचा विचार केला. सर्व एकाच ईश्वराची लेकरं आहेत असं सांगितलं. भेदाभेद अमंगळ असल्याचं सांगितलं. पुस्तकी ज्ञानापेक्षा आचरण श्रेष्ठ असल्याचं सांगितलं. या ब्रह्मज्ञानाचा लाभ ज्याला झाला, त्यालाच याची गोडी कळते. ज्यांना हे ज्ञान होतच नाही ते उगाच वायफळ तोंडची वाफ दवडत असतात.   उगाच बडबड करुन शिणतात. तुकाराम महाराज म्हणतात, *"ज्यासी असे लाभ तो चि जाणे गोडी । येर ती बापुडीं शिणलीं वांयां ।।"* अशांची बडबड निष्फळ असते. यांची अवस्था *"आप डुबे, खुद डुबे, औरोंको भी ले डुबे"* अशी असते. स्वतः तर बुडतातच, देशाला घेऊन बुडतात. आज हजारोंच्या संख्येने लोक मरत असताना भक्त थोडीच वाचत आहेत. अनेक भक्तांची कुटुंबंच्या कुटुंबं नष्ट झाली. वंशालाही कोणी शिल्लक राहिला नाही असं बातम्यांतून येत आहे. *"लगेगी आग तो आयेंगे कई घर जद में, यहाँ सिर्फ हमारा मकान थोडेही हैं ?"* असं राहत इंदोरी सांगून गेले. करोना हिंदू-मुस्लिम असा भेद करत नाही. देशाची अर्थव्यवस्था ढासळली तर सर्वच जातीधर्माचे लोक संकटात येतात. देशावर परचक्र आलं तर सर्वच जातीधर्माचे नागरिक संकटात येतात. समाजात जे फूट पाडतात, त्यातून त्यांचं स्वतःचं तर भलं होत नाहीच पण ते दुसऱ्यांचंही वाटोळं करतात. समाजाचंही वाटोळं करतात. म्हणून अशांना तुकाराम महाराज कळकळीने सांगतात, *"तुका म्हणे शहाणा होईं रे गव्हारा । चौऱ्यासीचा फेरा फिरों नको ।।"* अरे गव्हारा! मूर्खा! अशा चुकीच्या वर्तनामुळे तुला मुक्ती मिळणार नाही, मोक्ष मिळणार नाही, तुला हा भवसागर सुखरुप पार करता येणार नाही. तुझी नाव मध्येच बुडणार आहे. तुझं वाटोळं होणार आहे. चुकीच्या विचाराच्या, चुकीच्या माणसांच्या नादी लागू नको. *नाहीतर गुजराथ्यांसारखं होईल. आजच गुजराती वर्तमानपत्रातली एक बातमी वाचण्यात आली. सरकार म्हणतं कोरोनाने सात हजार माणसं मेलीत आणि दुसरीकडे फक्त एक्काहत्तर दिवसात पाचच जिल्ह्यात एक लाख तीस हजारावर मृत्यूची प्रमाणपत्रं वाटण्यात आली. म्हणून वेळीच सावध व्हा. चुकीच्या माणसांपासून, चुकीच्या विचारांपासून सावध रहा, दूर रहा. नाहीतर तुमच्या वाट्याला नरक आल्याशिवाय राहणार नाही, जसा तो आज गुजरात, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशच्या वाट्याला आला आहे. ही तर नुसती झलक आहे. हा नुसता ट्रेलर आहे. सिनेमा तर पुढेच आहे. यावरून वारकरी जर सावध होतील, हा सावधानतेचा इशारा ध्यानी धरुन जर वारकरी आचरण करतील तर वारकरी धर्म हा विश्वधर्म होऊन सर्व जगाला प्रकाश देईल. अवघ्या मानवतेला आपल्या कवेत घेईल. इतकं सामर्थ्य आपल्या संतांच्या विचारात आहे. गरज आहे ती करंटेपणा सोडायची. भावी पिढ्या तरी तो सोडतील अशी अपेक्षा करु.*

 *जय जगद्गुरू !*
रामकृष्ण हरि

No comments:

विठ्ठल

वैष्णव 👏🏻👏🏻💐💐

वैष्णव 💐💐💐 संतांची 'वैष्णव' ह्या शब्दाची व्याप्ती मोठी आहे. भागवतात एकनाथ महाराज लिहितात, 'जाणीव शहाणीव ज्ञातेपण । सांडुनी जा...