*माती तेची धुळ, धुळ तेचि माती*

 *माती तेची धुळ, धुळ तेचि माती*      


     *माती तेचि धुळ, धुळ तेची माती ।  

    भेंडा आणि भिंती काय दोन ॥

    साखरी ते गोडी, गोडी ते साखरेशी ।  

    थिजले तुपाशी काय दोन्ही ॥  

    डोळा ते बुबुळ, बुबुळ तो डोळा । 

    शांती ज्ञानकळा काय भिन्न ॥ 

   वदन ते ओठ, ओठ ते वदन ।   

   क्षेम अलिंगन काय दोन ॥ 

   जीभ ते पडजीभ,  पडजीभ ते जीभ ।  

   आशा आणि लोभ काय दोन ॥ 

   संत तेची देव, देव तेचि संत । 

   जनी म्हणे मात गोष्टी भिन्न ॥   

       *>----->       संत जनाबाई*


     *>---->     संत जनाबाई या अभंगात म्हणते,  "माती आणि  धूळ एकच आहेत. भेंडा आणि भिंत एकच आहेत. साखर आणि गोडपणा एकच आहेत. बुबुळ आणि डोळा एकच आहेत. ज्ञान आणि शांती एकच आहेत. ओठ आणि मुख एकच आहेत. क्षेम आणि अलिंगन एकच आहेत.   जीभ आणि पडजीभ  एकच आहेत. संत आणि देव एकच आहेत. या दोन्ही बाबी वेगळ्या नाहीत."*   

   *>----->  एकाच आशयाचे दोन शब्द वापरुन ते भिन्न नाहीत,  असे सांगून संत आणि देव वेगळे नाहीत असे  मुलभूत शाश्वत सत्य जनाबाईने कथन केले आहे.*    

 *>----->      धुळ हे मातीचे अभिन्न अंग आहे. तसेच  भेंडा हे भिंतीचे, गोडपण हे साखरेचे, ओठ हे चेहऱ्याचे, क्षेम हे अलिंगनाचे, पडजीभ हे जिभेचे, आशा हे लोभाचे अंग आहे. अशी व्यावहारिक रुपे सांगून संत हे देवत्वाचे रूप आहे असे प्रमेय जनाबाईने मांडले आहे.*      

 *>----->    संत म्हणजे काय ?  इतरांसाठी जे आपले आयुष्य व्यतीत करतात वा इतरांच्या सुखासाठी जे झिजतात, अशी संत या शब्दाची व्याख्या आहे. प्रारंभी सामान्य भक्त आणि देव यांच्यामधला  दुवा बनण्याचे काम संत करतात. हळुहळु त्यांची आंतरिक उन्नती इतकी होते कि ते स्वत:च देवरुप होतात.   "संत तेचि देव, देव तेचि संत"  या ओळीतुन संत जनाबाईने हे तत्त्व अधोरेखित केले आहे.*   

  *>------>    दुसरे महत्वाचे सूत्र जनाबाईने सांगितले आहे. ते म्हणजे,  "ज्ञाने तेचि शांती"  जेथे ज्ञान तिथे असते तिथे शांतता वास करते ज्ञानाने माणसाच्या जाणिवा समृद्ध, संपन्न होतात.  अज्ञानाचा तिमिर नाहीसा होतो.  ज्ञान प्राप्त झाले की मनातले संभ्रम निवळतात.  त्यामुळे अंधारातील  चाचपडणे संपून जाते आणि ज्ञानाच्या तेजोमय प्रकाशात  मनातल्या आत्मवृत्ती उजळून निघतात. मनातले  संशय, विकारांचे प्राबल्य हे सर्व निवळले की अपार, निरामय, शांतीचा अनुभव येतो.  संतांच्या ठायी  या शांतीचा वास असतो. म्हणूनच ते देवत्वाशी एकरूप होतात.    प्रत्यक्ष देवच होतात.*   

 *>------>       व्यवहारातील अनेक उदाहरणे देऊन जनाबाईने    "संत म्हणजे देव"       हे सत्य प्रतिपादन केले आहे.  जनाबाईच्या शब्दकलेचा गोडवा आपल्याला ओळीओळीतुन जाणवत राहतो.*   

                      *>----->     अमोल डोके*

No comments:

विठ्ठल

वैष्णव 👏🏻👏🏻💐💐

वैष्णव 💐💐💐 संतांची 'वैष्णव' ह्या शब्दाची व्याप्ती मोठी आहे. भागवतात एकनाथ महाराज लिहितात, 'जाणीव शहाणीव ज्ञातेपण । सांडुनी जा...