*गोपाळाशी खेळती*
*गोपाळांशी खेळती । आनंदे डोलती ॥
कृष्ण आमुचा सांगाती । डो डो डो डो डो ॥
कान्होबाची सांगती । ब्रह्मादिक इच्छिती ।
धन्य आम्ही म्हणती । अ ल ल ल ल ॥
कृष्णाप्रती गोपाळा । म्हणताती सकळ ।
आकळसी नाकळ । हा त त त त त ॥
मामा मारू गेलासी । आपटिले गजासी ।
मल्लयुद्ध खेळलासी । हू तू तू तू तू ॥
अजगर मारिला । वडवानळ गिळीला ।
गोवर्धन उचलिला । अ ब ब ब ब ॥
पुतनेसी शोषिले । नारदासी मोहिले ।
गणिकेसी उद्धारिले । अ रे रे रे रे ॥
गौळियांचे घरा जाशी । दही दूध लोणी खासी ।
त्यांच्या सुना मोहिसी । छी छी छी छी छी ॥
सोळा सहस्त्र भोगीसी । ब्रह्मचारी म्हणविसी ।
लटिकेचि डकविशी । लु लु लु लु लु ॥
सोडोनिया मीपण । आम्हा घाली लोटांगण ।
परब्रह्म नारायण । आ हा हा हा हा ॥
ऐसे तुझे पवाडे । वर्णिताती वाडेकोडे ।
विष्णुदास नामा म्हणे । यू यू यू यू यू ॥
>-----> संत नामदेव.
>-----> गवळण प्रकारातील या अभंगात संत नामदेव म्हणतात, "कृष्ण आमचा सांगाती आहे. तो गोपाळांबरोबर खेळतो आहे. कान्होबाचा संग ब्रह्मादिकांनाही हवाहवासा वाटतो. आम्ही कृष्णाच्या सहवासाने धन्य झालो आहोत. कृष्णाला सारेजण गोपाळ म्हणतात. तो कळूनही न कळण्यासारखा वाटतो. हे कृष्णा, तू आपल्या मामाला मारलेस, उन्मत्त हत्तीला उचलून खाली आपटलेस, मल्लांबरोबर मल्लयुद्ध खेळलास. तू अजगर मारलास, वडवानल गिळून टाकलास, गोवर्धन उचललास. हे "अबब" सा उद्गार काढायला लावणारे आश्चर्य आहे. तू पुतनेला मारलेस, नारदाला मोह पाडलास, गणिकेची उद्धार केलास, तु गवळ्यांच्या घरी जाऊन दही, दूध, लोणी खातोस, त्यांच्या सुनांना मोहात पाडतोस. छी छी, हे काही बरे नव्हे. सोळा सहस्त्र नारींबरोबर संग करूनही तू स्वत:ला ब्रह्मचारी म्हणवतोस. ही लुटूपुटूची लबाडी आहे काय ? तुझे देवपण सोडून तू आमच्यापुढे लोटांगण घालतोस. हे काय आहे ? हे देवा, तुझ्या नामाचे पोवाडे सर्वजण गातात. तुझ्या या कीर्तीने आम्हाला आनंद झाला आहे.
>------> खरंतर कृष्ण स्वतः परब्रह्म, अवघ्या विश्वाचा विधाता, पण लहानाहुन लहान होऊन गोकुळात गोपाळांसवे खेळतो, गवळ्याची घरी चोरी चोरून दही, दूध, लोणी खातो. गोपीची छेड काढतो. सहस्त्रावधी स्त्रियांशी विवाह करतो, पण तरीही स्वतःला ब्रह्मचारी असे म्हणवतो. तो सर्वत्र आहे, सारे काही करतो, पण त्याला समजून घ्यावे असे म्हटले तर तो जाणिवेच्या पलीकडे दशांगुळे उरतो.
>--------> कृष्णाच्या कृष्णपणाची अनेक रुपे नामदेवरावांनी वर्णिली आहेत. तो गोपाला बरोबर खेळ खेळतो. या खेळातील विविध नाद संत नामदेवांनी शब्दमय केले आहेत. डोडोडोडोडो, छीछीछीछीछी, लुलुलुलुलु, आहाहाहाहा, यूयूयूयूयू अशा विविध शब्दांचे विश्रम संत नामदेवांनी मांडले आहेत. हे जणू शब्दांचे खेळच आहेत.
>-----> संतांनी अध्यात्माचे तत्त्व काव्याच्या माध्यमातून सांगितले. काव्याकरिता काव्य करावे हे त्यांचे ध्येय नव्हते. पण अध्यात्म सांगताना काव्यरचनेचे अनेक प्रयोग त्यांनी केले आणि आपल्या अभिजात रचनांनी अध्यात्माला काव्याची बैठक दिली, मराठी भाषेला एक आगळेवेगळे वैभव प्राप्त करून दिले. संत नामदेवांची अमृतवाणी हे मराठी भाषेचे सांस्कृतिक लेणे आहे.
>-----> अमोल डोके*
No comments:
Post a Comment