राम म्हणे वाट चाली. . .


राम म्हणे वाट चाली |
यज्ञ पाऊला पाऊली ||१||
धन्य धन्य ते शरीर |
तीर्थव्रतांचे माहेर||२||
राम म्हणे करिता धंदा |
सुख समाधी त्या सदा||३||
राम म्हणे ग्रासोग्रासीं |
तोचि जेविला उपवासी||४||
राम म्हणे भोगी त्यागी |
कर्म न लिंपे त्या अंगी||५||
ऐसा राम जपे नित्य|
तुका म्हणे तो जीवनमुक्त||६||
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
भावार्थ : -राम राम असे प्रत्येक पावलागणिक म्हणत जो वाट चालतो त्याला अनेक यज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते.ज्या शरीराची सर्व कर्मे रामरूप झाली आहेत असे शरीर खरोखरच धन्य आहे. ते शरीर म्हणजे सगळ्या तीर्थांचे माहेर आहे.राम राम असे म्हणत जो कामधंदा करतो त्याला सतत समाधीच्या सुखाचा लाभ होत असतो.राम राम असे प्रत्येक घासागणिक म्हणत जो जेवण करतो, त्याला अन्न खाल्ल्यानंतरही उपवासांचे पुण्य लाभते. राम नामाचा उच्चार करत जो एखाद्या वस्तूचा भोग घेतो किंवा त्याग करतो, त्याला कोणत्याही प्रकारचे कर्म बंधनकारक ठरत नाही.म्हणुन जगद्गुरु तुकोबा म्हणतातअशा रितीने जो सतत रामनामाचा जप करतो, तो जीवन जगत असतानाही जीवनमुक्त असतो म्हणजेच त्याला कशाचीच बाधा पोहचत नाही. 
🌷🌷🌺🌺🌺🌺🌷 🌷

No comments:

विठ्ठल

वैष्णव 👏🏻👏🏻💐💐

वैष्णव 💐💐💐 संतांची 'वैष्णव' ह्या शब्दाची व्याप्ती मोठी आहे. भागवतात एकनाथ महाराज लिहितात, 'जाणीव शहाणीव ज्ञातेपण । सांडुनी जा...